यशवंतराव चव्हाण यांनी संयमाने तसेच विकासाच्या दृष्टीने समाजकारण व राजकारण केले. दुसऱ्याला दु:खी न करता प्रश्नांचा अभ्यास करून यथोचित विकास साधण्याचा त्यांचा पिंड होता. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राची संस्कृती वृद्धिंगत झाल्याचे ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी सांगितले.
शिक्षण मंडळ, कराड या संस्थेच्या माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघातर्फे आयोजित माजी विद्यार्थिदिन व यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सांगता समारंभात प्रमुख अथिती म्हणून ते बोलत होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, शिक्षण मंडळचे चेअरमन मुकुंदराव कुलकर्णी, ल. रा. जाखलेकर, डॉ. एस. जी. सबनीस, मकरंद महाजन, अनघा परांडकर, विद्यार्थी सेवासंघाचे अध्यक्ष विनायकराव पावसकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी रामचंद्र आफळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
अनंत दीक्षित म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांना राजकारणापेक्षा समाजकारणात अधिक रस होता. त्यांच्या संस्कारक्षम विचारांनी समाज प्रेरित झाल्याने देशाच्या राजकारणात ते संस्कार, संयम व राष्ट्रप्रेमाचा चिरंतन मानदंड ठरले. यशवंतरावांनी आपली आई हीच पहिली शाळा मानली. समाजाचा विकास साधताना नेहमीच धर्मनिरपेक्ष वृत्ती जोपासली. राज्याचा केवळ व्यापारी वा नागरी विकास न होता सामाजिक व सांस्कृतिक विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.
मुकुंदराव कुलकर्णी, डॉ. एस. जी. सबनीस, विनायकराव पावसकर, रामचंद्र आफळे यांनी मनोगत व्यक्त केले.