घरगुती गॅस सिलिंडरची ऑनलाइन नोंदणी सक्तीची नसल्याची बाब आज स्पष्ट झाली. नव्या पद्धतीबाबत पुरेशी साक्षरता झाल्याशिवाय या गोष्टीची सक्ती करू नका, अशी ताकीदच जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आज गॅस विक्रेते व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिली.
घरगुती गॅस सिलिंडरची राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असली तरी, त्याविषयी कुठलीच जागरूकता नसल्याने सामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोंदणीतच अडचणी असल्याने सिलिंडर मिळणे मुश्कील झाले असून पर्यायाने काळा बाजार तेजीत आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय झिंजे यांनी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सामान्यांच्या दृष्टीने क्लिष्ट असेलेली ऑनलाइन नोंदणीची पद्धत तातडीने बंद करावी अशी मागणी केली होती.
डॉ. संजीवकुमार यांनी यासंदर्भात आज बैठक बोलावली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी कासार, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती सगरे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे शंकरन वैद्य, भारत पेट्रोलियमचे गुप्ता यांच्यासह शहरातील गॅस वितरक या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत ऑनलाइन नोंदणी पद्धत सक्तीची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही ही बाब मान्य केली. त्याला अनुसरून डॉ. संजीवकुमार यांनी या सर्वांना त्याची सक्ती न करण्याची ताकीद दिली. या पद्धतीबाबत प्रथम ग्राहकांमध्ये जागृती करा, अशिक्षितांना ती व्यवस्थित समजावून सांगा, कालांतराने त्याची कार्यवाही करा अशी सूचना त्यांनी केली. तसेच याच विषयासंदर्भात येत्या दि. २५ ला जिल्ह्य़ातील गॅस वितरकांची नगरला कार्यशाळा घेण्याचीही सूचना त्यांनी केली. शेख व झिंजे यांनी ऑनलाईन नोंदणीतील तांत्रिक अडचणी, सामान्यांना होणारा त्रास आणि वितरकांच्या उद्धट वागणुकीबाबत अनेक तक्रारी केल्या, तसेच त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.