उड्डाणपुलालगतच्या रस्त्यांवरील धोके (राणेनगर व लेखानगर)
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघाताने उड्डाण पूल आणि त्याला लागून असणारे सव्‍‌र्हिस रस्ते यावरील धोकादायक वाहतुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. पाथर्डी फाटय़ाप्रमाणे राणेनगर आणि लेखानगरच्या चौकात छोटे-मोठे अपघात ही नित्याची बाब. आधीच अरुंद असणारा सव्‍‌र्हिस रस्ता बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनधारकांना एकेरी मार्ग वाटतो. परिणामी लेनचा नियम न पाळता भरधाव वाहने दामटली जातात. राणेनगरचा भुयारी मार्ग तोकडा पडत असताना लेखानगर चौकात अतिशय विचित्र स्वरूपाची चौफुली पार करणे स्थानिकांसाठी आव्हान ठरते. त्यातच राणेनगर ते लेखानगरच्या दरम्यान उड्डाण पूल खाली उतरून सव्‍‌र्हिस रस्त्याला समांतर आहे. पलीकडे जाण्यासाठी पादचारी थेट त्याचा वापर करत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
शहरातील जुन्या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल साकारण्यात आला. तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी सव्‍‌र्हिस रस्त्यांची नव्याने रचना करण्यात आली. यामुळे वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी तो बिकट झाला असून ठिकठिकाणी छोटे-मोठे अपघात, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राणेनगर व लेखानगर चौक हे चौक त्याची उदाहरणे. राणेनगर, इंदिरानगर, पेठेनगर, सिडको तसेच महामार्गाला जोडणारे हे चौक. बँका, व्यापारी संकुले, स्टेट बँक चौपाटी आणि सभोवतालच्या शाळा व महाविद्यालयात जा-ये करणाऱ्यांची या चौकात गर्दी असते. राणेनगरचा भुयारी मार्ग तुलनेत मोठा दिसत असला तरी सायंकाळी म्हणजे कारखान्यातील कामगारांची सुटी होते, तेव्हा चौकात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एखाद्या वाहनाने पुढे जाण्यासाठी नियम मोडला, तर कोंडी होऊन इतर वाहनधारकांना अडकून पडावे लागते. या चौकात ना सिग्नल यंत्रणा आहे, ना वाहतूक पोलीस. यामुळे वाहनधारकांवर कोणाचा अंकुश नसल्याचे दिसते. या चौफुलीपासून काही अंतरावर स्टेट बँक चौपाटी असून सायंकाळी खवय्यांची गर्दी उसळते. त्यांच्यासह परिसरातील हॉटेल व्यावसायिकांची वाहने वाहनधारकांसाठी अडथळा ठरतात.
राणेनगरपुढील लेखानगर चौफुली तयार करताना नेमके काय नियोजन केले हे समजत नाही. वळणाकार चौकातून वाहनधारकांना एका बाजूने दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे कोणते वाहन कुठून येईल याचा अंदाज बांधता येत नाही. पेठेनगर भागाकडून लेखानगर, शिवाजी चौकाकडे वळण घेताना पलीकडच्या सव्‍‌र्हिस रस्त्यांवरून भरधाव वाहने येत असतात. प्रत्यक्ष चौकातील विचित्र त्रांगडय़ामुळे अनेक अपघात घडले आहेत. राणेनगर व लेखानगर चौफुलीदरम्यान उड्डाण पूल खाली उतरला आहे. म्हणजे तो सव्‍‌र्हिस रस्त्याला समांतर आहे. लगतच्या झोपडपट्टीतील नागरिक एका बाजूने पलीकडे जाण्यासाठी सर्रासपणे त्याचा वापर करतात. उड्डाण पुलाच्या लोखंडी जाळ्यांवरून उडय़ा मारणारे नागरिक दृष्टिपथास पडतात. दीड ते दोन वर्षांपूर्वी लोखंडी जाळ्या तुटल्या असल्याने वाहनधारक याच पद्धतीने महामार्ग ओलांडत होते. त्यात चारचाकीचा अपघात होऊन एकाला प्राण गमवावे लागले. हे उदाहरण डोळ्यासमोर असूनही स्थानिक हा धोका पत्करतात. या भागातील सव्‍‌र्हिस रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यालगतची बडय़ा धेंडांची अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत. यामुळे काही ठिकाणी रस्ता अचानक अजून अरुंद होतो. स्थानिकांना त्याची काहीशी कल्पना असली तरी परगावातील वाहनधारकांना नसते. यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. ही अतिक्रमणे हटवून रस्ता विस्तीर्ण करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

लेखानगर जीवघेणा चौक
दोन्ही चौकातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांची संख्या अतिशय मोठी आहे. या स्थितीत महाविद्यालयीन युवक भरधाव मोटरसायकल दामटतात. सव्‍‌र्हिस रस्ता विस्तृत करणे आवश्यक आहे. विचित्र नियोजनामुळे लेखानगर चौक जीवघेणा ठरला आहे. प्रत्येक सव्‍‌र्हिस रस्त्यावर दुतर्फा वाहतूक आहे. मात्र बाहेरगावच्या वाहनधारकांना ती बाब ज्ञात नाही. रस्त्यावर ही बाब अधोरेखित करणाऱ्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. यामुळे लेन तोडून संबंधित वाहने चालवत असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकांशी धडकण्याची शक्यता असते.
बिपीन बच्छाव (स्थानिक नागरीक)

पुलालगत मोकळी जागा कशाला?
राणेनगर चौफुली पार करणे वाहनधारकांसाठी आव्हान आहे. सायंकाळी वाहनांची कोंडी होते. सव्‍‌र्हिस रस्ता एकेरी समजून वाहनधारक वाहने दामटतात. पुलालगत मोकळी जागा सोडल्याने सव्‍‌र्हिस रस्ते अरुंद झाले. त्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागतो. मनाला वाटेल त्याप्रमाणे वाहनधारक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी धडपडतात आणि त्यात आणखी भर घालतात. या चौकात सिग्नल यंत्रणाही बसविली गेलेली नाही.
– श्रीकांत मांडवडे (स्थानिक नागरीक)