महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेश मुख्य सभेने प्रशासनाला दिला आहे.
सणस मैदानासमोरील छत्रपती शिवाजी उद्यानात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय तसेच स्वच्छतागृह बांधण्यासाठी पाच लाख रुपये वर्गीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा ठराव मुख्य सभेपुढे आला होता. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव तसेच राहुल तुपेरे यांनी दिलेला हा ठराव सभेपुढे आल्यानंतर त्या निमित्ताने उद्यानांमधील स्वच्छतागृहांचा प्रश्न अनेक नगरसेवकांनी उपस्थित केला.
या उद्यानासह लोकमान्यनगर उद्यान आणि विजयानगर उद्यानात आकर्षक खांब बसवणे तसेच प्रकाश व्यवस्था करणे यासाठी साठ
लाख रुपये वर्गीकरणातून देण्याचे आणखी दोन ठराव मनीषा घाटे आणि अशोक येनपुरे यांनी दिले होते. तेही सभेत संमत करण्यात
आले.
शहरात शंभराहून अधिक उद्याने महापालिकेने विकसित केली असली, तरी अनेक उद्यानांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. रोज या उद्यानांमध्ये नागरिक मोठय़ा संख्येने येत असतात. मात्र, सोयी-सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उद्यानांमधील व्यवस्थेबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्या तातडीने दूर कराव्यात तसेच उद्यानांमध्ये जी आवश्यक कामे आहेत ती देखील तातडीने हाती घ्यावीत, असा सूचना या वेळी करण्यात आल्या.
सभेत या विषयावरील चर्चेनंतर शहरातील सर्व उद्यानांमध्ये स्वच्छतागृह बांधणे आवश्यक असून त्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशी सूचना सभागृहनेता सुभाष जगताप यांनी केली. तसेच त्यासाठीचा प्रस्तावही लगेच करून तो मंजुरीसाठी आणा. किती ठिकाणी अशी स्वच्छतागृहं बांधावी लागणार आहेत, किती ठिकाणी इतर सोयी-सुविधांची कमतरता आहे त्याचाही अहवाल करून तो मुख्य सभेपुढे ठेवावा, असेही प्रशासनाला सांगण्यात आले आहे.