गरीब विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित ठेवून फक्त प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सहलीला घेऊन जाण्याचा पराक्रम महापलिकेच्या शाळेत घडल्याने त्याचे जोरदार पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले. विद्यार्थ्यांमध्ये मतभेद करणाऱ्या अशा आधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित करीत गरीब विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित ठेवून अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये  दुजाभाव केल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी आलेले पैसे गेले कुठे, असा सवालही त्यांनी केला.
 त्यांना काँग्रेसच्या अजंता यादव यांनी पाठिंबा दिला. दुजाभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. तर मनसेचे प्रकाश दरेकर यांनी हा शिक्षणाधिकार कायदाचा अपमान असल्याचे सांगितले.
सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता या मुद्दय़ांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी हा मुद्दा फेटाळून लावला.