महापौर, उपमहापौरपदासाठी नवी मुंबईत एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी स्थापन होणाऱ्या आठ विषय समित्यांवरून काही प्रमाणात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. प्रशासनाने गतवर्षीपेक्षा या वर्षी आणखी दोन नवीन विषय समित्यांची स्थापना केल्याने या मतभेदात भर पडली आहे. महापौरपदासाठी दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसला सर्व विषय समित्यांचे सभापतिपद दिली जातील, असे ठरविण्यात आले होते. मात्र मागील सभागृहात सहा विषय समित्या होत्या. त्यात या वर्षी दोन समित्यांची भर पडल्याने त्या काँग्रेसला न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने त्यांचे समाधान करण्यात यावे, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात तयार झाला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३० अन्वये पालिका प्रशासनाने विषय समित्यांची स्थापना केली आहे. मावळलेल्या सभागृहात महिला बालकल्याण, आरोग्य, क्रीडा, विधि, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, पाणीपुरवठा अशा सहा समित्या अस्तित्वात होत्या. त्या ८ मे रोजी बरखास्त झाल्या. या समितीचे सदस्य व सभापती यांची पुनर्निवड शुक्रवारी होणाऱ्या महासभेत होणार आहे. प्रत्येकी १३ सदस्यसंख्या असलेल्या या समितीच्या सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी अनेक नगरसेवक इच्छुक असतात. स्वतंत्र दालन, वाहन, साहाय्यक आणि काही कोटींचे बजेट या समित्यांसाठी राखून ठेवले जात असल्याने त्यात नगरसेवकांना रस असतो.
पूर्वीच्या सहा समित्यांमध्ये आता आणखी दोन समित्यांची भर पडणार आहे. विद्यार्थी व युवक कल्याण समिती व उद्यान, शहर सुशोभीकरण अशा या दोन नवीन समित्या आहेत. त्यांचे सदस्य व सभापतींची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक ही निवड करणार असून महापौर सुधाकर सोनावणे ती सभागृहात जाहीर करण्याचे सोपस्कर पार पाडणार आहेत. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सभागृहातील बहुमतासाठी आणखी पाच नगरसेवकांची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसला पडली. त्या वेळी तीन अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोनावणे दाम्पत्य असे पाच नगरसेवकांचे संख्याबळ पूर्ण करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ हा जादूई आकडा पार केला होता पण तरीही भविष्यात जोखीम नको म्हणून काँग्रेसबरोबर आघाडी करून त्यांच्या दहा नगरसेवकांचा पांठिबा मिळविला. त्याबदल्यात दोन वेळा उपमहापौरपद, पाच वर्षे विषय समित्यांवरील सभापतिपद, आणि दोन वेळा वाशी प्रभाग समिती असा हा सौदा ठरविण्यात आला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने संमती दिली आहे. राष्ट्रवादीने हा सामंजस्य करार केला त्या वेळी पालिकेत विषय समित्यांची संख्या सहा होती आता ती आठ झाली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी सहा समित्यांवरील सभापतिपद देण्यास बांधील आहे पण जादा तयार झालेल्या दोन समित्यांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्णी लावण्यात यावी असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत तयार झाला असून राष्ट्रवादीत नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने येत्या पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाला एखादी समिती देण्याची जबाबदारी असल्याने हा नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
त्याला काँग्रेसचा स्पष्ट नकार असून पाच वर्षांत कितीही समित्या स्थापन झाल्या तरी त्याच्या प्रत्येक समितीवर काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी ही लागलीच पाहिजे असा पावित्रा काँग्रेसचा आहे. त्यामुळे शुक्रवारी जाहीर होणाऱ्या या समित्यांच्या सभापतिपद निवडीवरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुरबुरी सुरू झालेल्या आहेत.

काँग्रेस फुटणार?
शिवसेना, भाजप गोटातून काँग्रेस फुटणार असल्याच्या अफवा उठविल्या जात आहेत. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांपैकी सात नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. तीन अपक्ष नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान दोन नगरसेवक येत्या काळात विविध कारणास्तव अपात्र होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पमतात येईल अशा या अफवा आहेत. शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंगजंग पछाडले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न आजही शिवसेनेकडून केले जात आहेत. ही शक्यता काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. या सर्व अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. पालिकेत आघाडी पाच वर्षे कायम राहणार, असून आम्हाला सत्तेत समान वाटा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.