ग्रामीण भागात विशेषत आदिवासी भागातील दुर्गम पट्टय़ात आरोग्य विषयक सोयी-सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हा स्तरावर मोफत आयुष निदान व उपचार शिबीर भरविण्यात येणार आहे. याचा पुढील टप्पा म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येणार असून या माध्यमातून रुग्णांना समुपदेशन, औषध, वैद्यकीय सेवेसह विविध शंकावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी व्यापक स्वरूपात काम सुरू आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराचे वैशिष्ठय़े म्हणजे सर्व पॅथीतील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना ‘मधुमेह विकार व श्वास विकार, संधीवात’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून आयुष चिकित्सा तसेच सेवेविषयी नागरीकांमध्ये प्रबोधन करणे यावर भर देण्यात येईल. शिबिरांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हरसुल, त्र्यंबक, सुरगाणा, इगतपुरी या ठिकाणी हे शिबीर होईल. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण  रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच तज्ज्ञ निवड समिती, व्यवस्थापन समिती, औषध समिती, नियंत्रण समिती आदी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात जिल्हा शल्य चिकीत्सकांनी असंसर्गजन्य आजार यावर लक्ष केंद्रीत करत ३० वर्षांवरील नागरीक तसेच गर्भवती स्त्रिया यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र ‘नॉन कम्युनिकेबल डायझेस’ अर्थात ‘असंसर्गजन्य आजार’ कक्षाची स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून मधुमेह, कर्करोग, हृद्यरोग, वाढते ताणतणाव आदी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय तसेच रुग्णांसाठी उपचार सुविधा देण्यात येणार आहे. कक्षात अभियानाच्या माध्यमातून स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून एक समुपदेशकोची नियुक्ती होणार आहे. या माध्यमातून स्त्री व पुरूष यांच्यात सर्वसामान्यत आढळणारे कर्करोग, त्यांची स्क्रीनिंग तपासणी, हृद्यविकाराशी संबंधित आवश्यक चाचण्या, औषधोपचार आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुषच्या होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या अन्य शाखांच्या माध्यमातून उपचार कसे घेता येतील यावर लक्ष केंद्रीत होणार आहे. कक्षाच्या कामकाजाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची तपासणी झाली आहे. कक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय झाल्यानंतर पोलीस तसेच महसूल अशा शासकीय आस्थापनातील कर्मचारी, अधिकारी यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

आरोग्य जपण्यास प्राधान्य
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असंसर्गजन्य आजारांनी बाधित रुग्ण शोधणे, त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि समुपदेशन देण्यावर भर आहे. मात्र त्याच वेळी शासकीय आस्थापनासह सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य कसे अबाधित राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कक्षाच्या माध्यमातून एकाच वेळी जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.
– डॉ. एकनाथ माले (जिल्हा शल्यचिकित्सक)