विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्यावतीने नागपूर जिल्ह्य़ातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन अदा न झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. मे महिना संपण्याची वेळ आली असूनही एप्रिलचे वेतन अद्याप न झाल्याने शिक्षक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांचे वेतन नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषामार्फत व्हायचे. परंतु डिसेंबर २०१३च्या वेतन देयकापासून नियमित वेतन होण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. माहे जानेवारी २०१४चे वेतन वेळेवर होऊ शकले नव्हते. तेव्हा संपूर्ण जिल्ह्य़ात १४ शिक्षक संघटनेच्या कृती समितीने आंदोलन केले. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे, अशी शिक्षण संघटनांची मागणी होती. तीन सप्टेंबर २०१३च्या शासन निर्णयाद्वारे तशी तरतूद झाली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या स्थगनादेशामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शेवटी मार्च महिन्यात जिल्हा बँकेमार्फत शिक्षकांचे वेतन झाले. मार्च २०१४चा पगार मिळाला. परंतु एप्रिल २०१४चा पगार १३ मे रोजी जमा झाला. १४ तारखेला सुटी आली. १५ तारखेला शिक्षकांच्या खात्यावर पगार नोंदवला गेला व १६ मे रोजी शिक्षकांच्या पगाराचे बँकेमार्फत वाटप होणार होते. परंतु १५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता रिझव्‍‌र्ह बँकेचा जिल्हा बँकेला आदेश
आला व १६ तारखेपासूनचे जिल्हा बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले. जिल्ह्य़ातील संपूर्ण शिक्षकांचे पगार त्यामुळे अडकले. परत एकदा शिक्षक वेतनामुळे हवालदिल झाले. जानेवारी २०१४पासून हा वेतनाचा लपंडाव सुरू झाल्यामुळे शिक्षक वैतागून गेले आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या मनात शासनाविरुद्ध असंतोष भडकत आहे. शासनाने शिक्षकांच्या संयमाचा अंत न पाहता योग्य तो निर्णय घेऊन शिक्षकांचे पगार वेळेवर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा येत्या दिवसात शासनाच्या विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी शिक्षक संघटना करेल, असा इशारा देण्यात आला आहे. संघटनेमार्फत शिक्षकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विज्युक्टाचे सरचिटणीस अशोक गव्हाणकर यांनी शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर केले.