जिल्ह्य़ात पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून दुष्काळी अहवाल केवळ कागदावरच न देता प्रत्यक्ष गावात जाऊन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
बीड जिल्ह्य़ात पावसाअभावी ६८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी भागात योग्य उपाययोजना करणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र गांभीर्याने घेत नाहीत. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांना पत्र लिहिले असून त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी गावपातळीवर दौरे न करताच अहवाल देतात. त्यामुळे पाणी, चारा या प्रमुख बाबीदेखील स्पष्ट होत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हा परिषदेकडून निष्काळजीपणा होत असून मस्टरच्या नोंदी अद्ययावत नसणे, झालेल्या कामाची नोंद एमबीवर न घेणे आदी प्रकार घडत आहेत.
तरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.