पाटण तालुक्यातील मस्करवाडीच्या नाईकपेरा शिवारातील शेतात काम करणाऱ्या रामचंद्र श्रीपती माने (वय २८) या तरुण शेतकऱ्यांवर डझनभर रानडुकरांच्या कळपाने अचानक हल्ला केल्यामुळे ते जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चाफळ विभागातील कोळेकरवाडी, महाबळवाडी, बहिरेवाडी, गणेवाडी, गुजरवाडी, खोचरेवाडी, विरेवाडीसह डोंगराच्या पायथ्यालगत असलेलया गावात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनखात्याने या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत मात्र, त्याकडे वनखात्याने डोळेझाक केली गेल्यामुळेच मस्करवाडीतील घटना घडल्याचा आरोप होत आहे.  
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की चाफळ परिसरातील डोंगरी व दुर्गम भागात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांवर हल्ले सुरू केले आहेत. मस्करवाडी येथील तरुण शेतकरी रामचंद्र माने हे आपल्या शेतात काम करत असताना अचानक रानडुकरांचा कळप आला. त्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असता कळपाने त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.