शासनाच्या तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडीवरून करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी होऊन त्यात एका महिलेसह सहा जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोकरी येथे तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीत पांडुरंग दौलत खरात (३८) यांना विरोधी गटाच्या अप्पा चौगुले, अंगद सांगवे, रोहिदास सांगवे, प्रकाश बोरकर, अनिल बोरकर आदी अकरा जणांच्या जमावाने गोंधळ घालून नवा अध्यक्ष का निवडता, असा जाब विचारत ग्रामसभेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे गोंधळाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या वेळी अप्पा चौगुले व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात मनीषा पांडुरंग खरात व महादेव आदिनाथ वाघमोडे हे दोघे जखमी झाले. तर याउलट, खरात गटाकडून तलवार, लोखंडी सळई व दगडांनी झालेल्या हल्ल्यात दत्तात्रेय बोरकर यांच्यासह अप्पासाहेब शिवाजी चौगुले, अंगद भगवान सांगवे, रोहिदास भगवान सांगवे आदी जखमी झाले. याप्रकरणी शिवाजी खरात, शहाजी खरात, रामभाऊ खरात, हिराजी खरात यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.