बनावट नोटा जवळ बाळगल्याबद्दल सत्र न्यायालयाने जरीपटका येथील एका तरुणाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
जरीपटका भागातील सिंधू बालोद्यानजवळ राहणाऱ्या मनीष किशोरलाल देवानी याच्या घराच्या आवारात ठेवलेल्या मोटारसायकलच्या सीटच्या खाली कॅरीबॅगमध्ये बनावट नोटा ठेवल्या असल्याची गुप्त माहिती जरीपटका पोलिसांना १६ ऑक्टोबर २०१० रोजी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी या माहितीची त्वरित दखल घेऊन घटनास्थळी छापा मारला. तथे उभ्या असलेल्या एम.एच.३१ बीके – १३०५ क्रमांक्च्या मोटारसायकलच्या सीटच्या खाली पेपरमध्ये गुंडाळून एका कॅरीबॅगमध्ये बनावट नोटांचे पुडके  ठेवले होते. पंचांच्या मदतीने तपासणी करून १०० रुपये किमतीच्या १३७ नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
या नोटा रिझव्‍‌र्ह बँक आणि नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. नोटा बनावट असल्याबाबत त्यांचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे जरीपटका पोलिसांनी मनीष देवानी याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४८९ (क) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक एस.आर. कोरे व उपनिरीक्षक कांचन मुद्गल यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी आरोपी मनीष देवानी याच्याविरुद्धचा आरोप सिद्ध झाल्याचा निर्वाळा दिला. या गुन्ह्य़ासाठी त्यांनी आरोपीला ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि तो न दिल्यास आणखी १ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील कल्पना पांडे व अतिरिक्त सरकारीवकील सतीश रोडे यांनी काम पाहिले, तर आरोपीची बाजू अ‍ॅड. राजेश तिवारी यांनी मांडली.
हा गुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा देणारा असल्याने देशविरोधी असून गंभीर आहे. असे गुन्हे फार कमी उघडकीला येतात. सामाजिक क्षेत्र, वैयक्तिक सुरक्षितता व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होणाऱ्या बाबी कठोरतेने हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीला दया दाखवल्यास चुकीचा संदेश समाजात जाईल, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. जलदगती न्यायालयाने फक्त ३१ दिवसात सुनावणी करून या खटल्याचा निकाल लावला.