गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी उघडली असून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कुख्यात गुंड भरत उर्फ रवी शेट्टी (२८) यास कुर्ला येथे सापळा लावून अटक केली. गेली अनेक वर्षे शेट्टी मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने फेरीवाला आणि रिक्षावाल्यांचा वेषांतर केले होते.
मुंबईत गुन्हेगारी टोळ्या सक्रीय होत असल्याने टोळ्यांमधील गुंडांना शोधून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी दिले होते. त्यासाठी खंडणीविरोध पथक कामाला लागले होते. कर्नाटकातील कुख्यात गुंड भरत उर्फ रवी शेट्टी मुंबईत येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांना मिळाली होती. त्यांनी कुर्ला येथे सापळा लावला. त्यासाठी त्यांनी रिक्षाचालक, फेरीवाले बनून वेषांतर केले आणि सापळा लावला. भरत शेट्टी येताच पथकाने
त्याला पकडले. त्याच्याकडून ७.६५ बोअरचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. डोंबिवली येथील
तो राहात असलेल्या घरातून चाकू,
कुकरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
मूळ कर्नाटकातील असलेला शेट्टी हा २००१ साली कर्नाटकमधील एका बस डेपोत एकाची हत्या करून फरारी झाला होता. एका व्यापाऱ्याचे त्याने खंडणीसाठी अपहरण केले होते. त्याचा साथीदार मुरली शेट्टी याच्या मदतीने त्याने नाशिक येथे एका सराफावर गोळीबार करून लुटले होते. मुंबईत तो कुणाला मारण्यासाठी आला होता त्याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, जयवंत सकपाळ, अनिल वडवाने, विनायक मेर, विवेक भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, नितीन महाडिक, प्रभाकर जोशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.