लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यालगत मंगळवारी रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात दोन चोरटय़ांनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरटय़ांनी लुटमारीत २४ हजारांचा ऐवज लंपास केला.
कोटमगाव रस्त्यावरील एडीएफ खळ्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये छत्तीसगढ येथील साहु कुटुंब दोन मुलांसह एक दिवसापूर्वी राहण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री भर झोपेत असताना शेडचा दरवाजा तोडून दोन व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यांनी संतोषी साहू आणि पती विनायक साहू यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या संतोषी यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरटय़ांनी काढून घेतली आणि पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.