Heart Attack In Summer : हिवाळ्यात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असे तुम्ही अनेकदा वाचले असेल. हिवाळ्याबरोबर उन्हाळ्यातसुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो, असे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

धरमशिला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. आनंद कुमार पांडे सांगतात, ” उन्हाळ्यात अति उष्णतेमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणाली (System) शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात जसे रक्तवाहिन्यांचा आकार कमी झाल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, तसेच उन्हाळ्यातसुद्धा उष्णतेचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होतो.

नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील मेडिसीन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदा नंद झा सांगतात, “उन्हाळ्यात हृदयाला सामान्य दिवसांपेक्षा दोन ते चार पट जास्त रक्ताभिसरण करावे लागते. जर शरीर थंड झाले नाही तर त्या व्यक्तीला उष्माघात होण्याचा धोका असतो, जे जीवघेणे ठरू शकते. उष्माघात कोणालाही होऊ शकतो, पण ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहे, त्यांना याचा धोका अधिक असतो.”

पुढे डॉ. झा सांगतात, “मूत्रपिंडाची निकामी होणे, मधुमेह मेलेटेस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी, ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि सेंट्रल अॅपनिया सिंड्रोमसारखे झोपेचे आजार आणि शरीरात रक्ताची कमतरता, म्हणजेच अॅनिमिया हे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये या आजारांविषयी काळजी घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य जपता येईल.”

हेही वाचा : तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा

हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात हृदयाच्या आरोग्याशी संबंधित खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

 • छातीत दुखणे
 • छाती जड वाटणे
 • श्वास घेण्यास त्रास होणे
 • हृदयाचे ठोके वाढणे
 • पायांवर सूज येणे
 • चक्कर येणे
 • हात दुखणे
 • अंधारी येणे

उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

 • अतिप्रमाणात व्यायाम करू नका. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे हृदयावर ताण येतो. जर अति कठोर व्यायाम केला तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
 • उन्हाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या. यामुळे शरीराच्या तापमानात समतोल राखण्यास मदत होते.
 • उन्हाळ्यात अल्कोहोल आणि कॅफिन घेणे टाळा, यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.
 • संतुलित आहार घ्या. ताजी फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, मसूर आणि शेंगांचा आहारात समावेश करा. जंक, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळा.
 • तुमच्या आहारातील सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण कमी करा.
 • आहारात जास्तीत जास्त फळांचा आणि भाज्यांचा वापर करा.
 • आहारात फायबरचे प्रमाण वाढवा.
 • याशिवाय गोड पदार्थ खाणे टाळा.
 • कमी फॅट्सयुक्त किंवा फॅट्स नसलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा.