नवी मुंबई पालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात पुन्हा पोस्टर वर चमकणाऱ्या मंडळींचे प्रमाण वाढले असून, पालिकेने केवळ ५८ पोस्टरवर कारवाई केल्याची नोंद आहे. प्रभाग अधिकारी प्रभागातील फलकांवर वेळीच कारवाई करीत नसल्याने हे प्रमाण वाढले आहे. यात आता केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर होर्डिग्जवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरणांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर जुजबी कारवाई करणाऱ्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबईत आता पुन्हा बेकायदेशीर होर्डिग्जचे प्रमाण वाढले आहे.
काही ठिकाणी लागलेले नवीन वर्ष शुभचिंतनाचे फलकदेखील अद्याप उतरविण्यात आलेले नाहीत. संक्रांतीमुळे हळदीकुंकू साजऱ्या करणाऱ्या राजकीय व अराजकीय मंडळांची जाहिरात वाढली आहे. नवी मुंबईत तीन महिन्यांनंतर निवडणुका असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना हे पोस्टरच आधार ठरणार आहेत. त्यामुळे त्यांचा आग्रह जास्त आहे. ऐरोली रेल्वे स्थानकाच्या कुंपणावर या पोस्टर बॉईजची रेलचल मोठय़ा प्रमाणात आढळून आली आहे.
तरीही प्रभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील डोळे बंद करून आहेत. त्यात आता भाजपचे कार्यकर्ते कधी नव्हे ते जाहीरपणे वाढदिवस साजरे करू लागले आहेत. त्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या छायाचित्रासह हे कार्यकर्ते चमकू लागले आहेत. पालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्यावर तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.

बेकायदेशीर होर्डिग्ज हटविण्यासाठी पालिकेचा टोल फ्री क्रमांक
१८००२२२३०९/१०