घरजागा विकण्याच्या वादातून शहरातील सोरेगाव येथे भीमनगरात ८०-९० जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले. यात एका मुलासह चार महिलांचा समावेश आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
सत्यभामा दगडू कांबळे, दगडू कांबळे, यल्लप्पा शिवशरण, विजयकुमार शिवशरण, राजश्री बनसोडे, भीमाशंकर बनसोडे, भाग्यश्री दुपारगुडे, जयश्री जाधव, तिचा मुलगा प्रवीण जाधव, अमोल बनसोडे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्वाना छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर सोरेगावच्या भीमनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यासंदर्भात जयवंत दगडू कांबळे (वय ३९, रा. कसपटे वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कांबळे कुटुंबीय हे मूळचे सोरेगावचे राहणार आहेत. कांबळे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक सोरेगाव येथे मरिआई यात्रेसाठी आले होते. यात्रा आटोपून सारे जण भीमनगरातील आपल्या घरात बसले असताना अचानकपणे त्यांच्या घरावर सशस्त्र हल्ला झाला.
घरजागा विकण्याच्या कारणावरून जयवंत कांबळे व त्यांच्या भावकीत वाद होता. त्यातूनच भावकीतील मिथुन कांबळे, किरण कांबळे, गौतम कांबळे यांच्यासह मारुती कांबळे, त्याची पत्नी कट्टाबाई कांबळे, ओंकार कांबळे, बाळू कांबळे, त्याची मुलगा सुकेशिनी कांबळे आदींसह ८० ते ९० जणांच्या जमावाने हातात लोखंडी गज, काठय़ा, कोयते, दगड घेऊन हल्ला केला. या वेळी दोन मोटारसायकलींचेही नुकसान झाले.