लाच घेताना एखादा शिपाई वा अधिकारी पकडला गेला तर संबधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाने दुसऱ्या दिवसापासून कामावर येऊ नये, अशी तंबी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी अलीकडे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मारीया यांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या नैतिकतेलाच आव्हान केल्याचे बोलले जात आहे.
आपला शिपाई वा अधिकारी याच्यावर नियंत्रण नसणाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या सर्वोच्च पदी बसूच नये. अशा वरिष्ठ निरीक्षकाने स्वत:हून बाजूला व्हावे, अशीच आयुक्तांची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. मारीया यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या काळात लाच स्वीकारल्याप्रकरणी तीन-चार पोलिसांना अटक झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत प्रत्येक आठवडय़ात एकतरी शिपाई वा उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाचा अधिकारी अडकला जातो. मात्र आता यापुढे लाच घेताना एखादा शिपाई वा अधिकारी पकडला गेला तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून वरिष्ठ निरीक्षकांनी पोलीस ठाण्यात हजर होऊ नये, असे मारीया यांनी बजावले आहे.
पोलीस दलातील भ्रष्टाचार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एखादा शिपाई वा अधिकारी लाच घेताना पकडला गेला तर थेट वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई करण्याचे हत्यार आतापर्यंत वापरले गेले आहे. विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनीही त्याचा वापर केला आहे. महेश नारायण सिंग हे आयुक्त असताना लाच घेताना शिपाई वा अधिकारी पकडला गेला तर वरिष्ठ निरीक्षकाची बदली केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार काही वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. मारीया यांचा दृष्टिकोन तसाच असल्यामुळे वरिष्ठ निरीक्षक धास्तावले आहेत.

..तर कोणाला दोषी धरणार
शिपाई वा अधिकारी पकडला गेला तर वरिष्ठ निरीक्षकाने घरी बसावे, अशी आयुक्तांची सूचना असली तरी वरिष्ठ निरीक्षक लाच घेताना अडकला तर कोणाला दोषी धरणार, असा सवाल केला जात आहे. पूर्व उपनगरातील एका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने प्रत्येक शिपाई, हवालदाराकडे दर आठवडय़ाला लाच मागितली आहे. अशा वेळी ही मागणी पूर्ण करण्यासाठी शिपाई वा अधिकाऱ्यांना लाच गोळा करीत फिरावे लागत आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. अशाच लाचखोरीतून मुलुंड येथे शिपाई आणि हवालदाराला अटक झाली. एका पानाच्या ठेल्यावाल्याकडून गुटखाविक्री केली म्हणून १५ हजारांची लाच मागण्यात आली होती, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.