‘‘आजही कित्येकदा सत्य सांगणे गुन्हा ठरते. लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या काळी सत्य सांगू इच्छिणाऱ्यांना संरक्षण दिले. पण यांच्या कार्याची आज समाजाला फारशी जाणीव नाही,’’ असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदे’ तर्फे कोत्तापल्ले यांना रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते ‘क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विश्वशांती भवन (आळंदी) व माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, रतनलाल सोनग्रा, माजी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विकास मठकरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदेचे अध्यक्ष हनुमंत साठे या वेळी उपस्थित होते. २१ हजार रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोत्तापल्ले यांनी सांगितले की, ‘‘एकोणिसावे शतक प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या जाणिवा पेरण्याचे होते. पण समाजाच्या जडणघडणीसाठी पायाभूत ठरलेल्या महापुरुषांचा लिखित इतिहासच आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज समाजाला फारशी माहिती नाही. लहुजींचे चरित्र लिहिले गेले पाहिजे. त्यासाठी लहुजींच्या गावी पुरंदर भागात पायपीट करावी लागेल. तेथील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधून लहुजींच्या आठवणी मिळवाव्या लागतील. हे अवघड काम आहे, पण ते करायला हवे.’’     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडा!
दिल्ली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर आठवले यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘रांजे गावच्या पाटलाने महिलेवर अत्याचार केल्याबद्दल शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे त्याचे हातपाय तोडले होते, तसे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडायला हवेत. आपण केलेल्या चुकीची त्यांना क्षणोक्षणी जाणीव व्हायला हवी.’’

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lahuji vastad work unknown to the society kottapalle
First published on: 23-12-2012 at 02:48 IST