दुष्काळापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) बागुलबूवा उभा करत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल तसेच आसपासच्या परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी बाजारात पुन्हा एकदा तेजीचा माहोल उभा केला असून यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या एलबीटीच्या दरसूचीमधून भाज्या, फळे, कांदा-बटाटा, अन्नधान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. तरीही एलबीटीमुळे भाज्या महाग होत असल्याची आवई किरकोळ बाजारत उठवली जात आहे..
दुष्काळ तसेच कडक उन्हाळ्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात भाज्यांची चांगली आवक सुरू आहे. भाजीपाल्याने भरलेले सुमारे ४७५ ते ५०० गाडय़ा दररोज या बाजारात दाखल होत आहेत. असे असूनही किरकोळ बाजारात वाटाणा-(८० रुपये), फरसबी (७५), काकडी (४०), कोबी (२५) अशा सर्वच भाज्यांचे भाव महागले आहेत. भाज्या महाग का, असा प्रश्न विचारताच हे किरकोळ विक्रेते एलबीटीमुळे असे उत्तर देताना दिसत आहेत.
साधारणपणे एप्रिल, मे महिन्याच्या मध्यावर उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक कमी होते, असा आजवरचा अनुभव आहे. वाशी येथील घाऊक बाजारातून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या उपनगरांना भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे वाशी बाजारात आवक घटताच त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. उन्हाळ्यात भाजी महागते असा सर्वसाधारण अनुभव असला तरी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही यंदा भाज्यांची आवक बऱ्यापैकी सुरू आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक िपगळे यांनी दिली. या बाजारात गुरुवारी दुपापर्यंत ४५० गाडय़ा दाखल झाल्या होत्या. हे प्रमाण तितकेसे वाईट नाही, असा दावा िपगळे यांनी केला.

बनवेगिरी
मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना होणारा भाज्यांचा पुरवठाही उत्तम प्रकारे होत असून भाजीपाल्याने भरलेल्या सुमारे ६५० ते ७०० गाडय़ा या परिसरात रवाना होत आहेत, अशी माहिती बाजार समितीमधील प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजी महागण्याचे तसे ठोस कारण नाही, असे एपीएमसीमधील जाणकारांचे म्हणणे आहे. तरीही किरकोळ बाजारात महागाई अवतरू लागली असून सर्वच भाज्यांचे दर घाऊक बाजाराच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट झाले आहेत. घाऊक बाजारात १० रुपये किलोने विकला जाणारा फ्लॉवर वाशी, पनवेल, ठाण्याच्या किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपयांनी विकला जात असून दुय्यम दर्जाची भेंडी घाऊक बाजारात १९ रुपयांनी विकली जात असताना किरकोळ बाजारात ५० रुपये असा तिचा दर आहे. उन्हाळ्यात वाटाणा महागतो हे जरी खरे असले तरी घाऊक बाजारात अजूनही वाटाण्याचे दर ४० रुपये किलो असा आहे. किरकोळ विक्रेते मात्र वाटाण्याची शंभरी गाठण्याची तयारीत असून सध्या ८० रुपये किलो अशाच दराने त्याची विक्री सुरू आहे. गवार- ५० रुपये, काकडी -३५, फरसबी- ८०, गाजर- ४०, काकडी – ३५ अशा सगळ्याच भाज्यांचे दर वधारले आहेत. एलबीटीमुळे दर महागले अशी उत्तरे किरकोळ विक्रेत्यांकडून दिली जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.