मुंबईत ९४.३२ टक्के नालेसफाई झाल्याचे अगदी आकडेवारीनिशी सांगणाऱ्या महापालिकेचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पडले. नाल्यातून काढलेल्या गाळ व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवून अधिकारी सुस्त झाले होते. प्रत्यक्षात किती गाळ-कचरा नाल्यातून काढण्यात आला याची नोंदच पालिकेकडे नाही. त्यामुळे ‘गाळ गेला कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांच्या पावसाने पालिका खोटारडी असल्याचेच दाखवून दिले.
नाले आणि नद्यांमधून काढण्यात येणारा गाळ-कचरा मुंबईमधील क्षेपणभूमीत टाकण्यात येत होता. क्षेपणभूमीत त्याची मोजदाद होत होती. परंतु मुंबईतील क्षेपणभूमीत गाळ टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे गेल्या वर्षीच पालिके पुढे पेच निर्माण झाला होता. परंतु ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षभरात कोणतेच प्रयत्न केले नाहीत. पावसाळा जवळ येऊ लागताच नाले आणि नद्यांमधील गाळ-कचऱ्याची पालिका अधिकाऱ्यांना आठवण झाली आणि त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र नाल्यातील गाळ-कचऱ्याची विल्हेवाट कंत्राटदारानेच लावण्याची अट निविदेत घालण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला कंत्राटदारांनी या कामाकडे पाठ फिरविली. परिणामी प्रशासनावर फेरनिविदा काढण्याची वेळ आली. अखेर काही कंत्राटदारांनी नालेसफाचे काम स्वीकारले. परंतु त्यानंतर कंत्राटदारांच्या हाती कार्यादेश पडण्यासही विलंब झाला. परिणामी दरवर्षी एप्रिमध्ये सुरू होणाऱ्या नालेसफाईला मेपर्यंत ब्रेक लागला.
पालिका अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कंत्राटदार दिवस-रात्र नाले-नद्यांतून गाळ उपसत होते. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काहीच काम झाले नाही. अधूनमधून कंत्राटदाराचे कामगार नाल्यातून गाळ उपसून तो काठावरच टाकून निघून जात. पहिल्याच पावसात काठावरील हा गाळ पुन्हा नाल्यात गेला आणि नाले तुंबले.
कंत्राटदारांनी नाल्यांतील गाळ मुंबईबाहेर खासगी भूखंडावर टाकण्याची परवानगी जमीन मालकांकडून मिळविल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते. परंतु कंत्राटदारांनी प्रत्यक्षात तेथे किती गाळ टाकला याची माहिती पालिकेकडे नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी नाले-नद्यांमधून उपसलेल्या गाळाची आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी गाळ टाकण्यात येणार होता त्याही गुलदस्त्यातच आहेत. नदी-नाल्यांतील गाळाबाबत कंत्राटदार-अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचविल्यामुळे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यावर घूमजाव करण्याची वेळ आली.
आयुक्त कागदी घोडे नाचवतात – निकम
पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई उरकण्यात आली. मात्र त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागले. सत्ताधारी शिवसेना-भाजपचाही पालिका अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. अधिकारी जसे सांगतील तसे आयुक्त सीताराम कुंटे कागदी घोडे नाचवित असतात, असा आरोप विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला आहे. कुंटे यांनी नाले आणि नद्यांचा फेरफटका मारावा. अधिकारी सांगतील तेथे न जाता नगरसेवकांची मदत घ्यावी. मग नाल्यांची झालेली दुर्दशा त्यांच्या दृष्टीस पडेल, असेही ते म्हणाले.
पहिल्याच पावसाने आयुक्तांना उघडे पाडले – लांडे
गेले दोन दिवस पाऊस पडला आणि घरांमध्ये पाणी शिरले. रस्ते, रेल्वे स्थानके पाण्याखाली गेली आणि मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. नालेसफाई पूर्ण झाल्याची टिमकी पालिका आयुक्त सीताराम कुंटे वाजवित होते. परंतु पहिल्याच पावसामुळे ते उघडे पडले. नाले आजही गाळातच आहेत. आता ठेकेदारांवर कारवाई करण्याची भाषा ते करीत आहेत. सत्ताधारी शिवसेना-भाजप प्रमाणे प्रशासनालाही आता खोटी आश्वासने देण्याची सवय लागली आहे.
पावसाळा दोनच दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. युद्धपातळीवर नालेसफाई करा आणि पुढील चार महिने मुंबईकरांना दिलासा द्या, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले.