कायद्यापेक्षा प्रत्येकाच्या मानसिकतेमुळे महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. जीवनातील प्रत्येक अंगाशी या क्षेत्राची व्याप्ती जोडली गेली आहे. सहकार चळवळीत काही स्वाहाकार करणारी मंडळी असली तरी पारदर्शक व निकोप व्यवहारांमुळे अनेक संस्थांची प्रगती साधली गेली, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी येथे केले.
शहरात ५९ व्या सहकार सप्ताहानिमित्ताने जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड आणि सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्या वतीने सहकार दिंडी आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने डॉ. हेडगेवार चौकात सहकार ध्वजवंदन व ग्रंथ दिंडीचे पूजन गुजराथी, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. गुजराथी गल्ली, राणी लक्ष्मीबाई चौक, गोलमंदीर या भागातून शोभायात्रा काढण्यात आली. बोथरा मंगल कार्यालयात झालेल्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक बनसोडे होते. याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, चोपडा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, माजी नगराध्यक्षा डॉ. सुशिलाबेन शहा उपस्थित होते.
प्रास्तविक बापू देशमुख यांनी केले. बनसोडे यांनी जळगाव जिल्ह्य़ाला पतसंस्थांच्या घोटाळ्यांनी डाग लागल्याचा आरोप केला. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे. सहकारासोबत पाणी वाचविण्यासाठी सहकार संस्थांच्या माध्यमातून जलव्यवस्थापन निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन चोपडय़ाचे सहाय्यक उपनिबंधक अजय गुजराथी यांनी केले. याप्रसंगी शेतकरी संघाचे अध्यक्ष डोंगर पाटील, हिंमतसिंग पाटील हे उपस्थित होते.