एका नाल्यावरील पुलाच्या कामाचे निमित्त करून तालुक्यातील घोटी शहरातून नाशिककडे जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी महिन्यापासून बंद करण्यात आल्याने घोटीतून नाशिककडे जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. पुलाच्या या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन लांबच लांब रांगा लागत आहेत.
घोटीतून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचा मुख्य भाग समजल्या जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नाल्याचे काम अद्यापही करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील विद्युत खांब न काढता घाईगर्दीत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा सपाटा संबंधित ठेकेदाराकडून लावण्यात आल्याने त्याचा परिणाम रस्ता कामाच्या गुणवत्तेवर होत आहे. नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर असणाऱ्या नाल्यावर पुलाचे काम ऐन पावसाळ्यात करण्यात येत असल्याने रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे महिन्यापासून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
या नाल्यात मागील महिन्यात एक वाहन कोसळले होते. पुलाच्या कामाच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराने महिन्यापासून वहिवाटीचा रस्ता बंद करून वाहनचालक आणि नागरिकांना वेठीस धरले असल्याचे म्हटले जात आहे. या रस्त्याचे काम जलदपणे पूर्ण करण्यात यावे, रस्त्यालगतच्या नाल्याचे काम प्रथम पूर्ण करावे, अपूर्ण राहिलेल्या दुभाजकांच्या कामासह रस्त्यावर अपघातास निमंत्रण देणारे धोकादायक विद्युत खांब व रोहित्र तातडीने इतरत्र हलवावेत, रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशा मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.
दीड वर्षांपासून रस्त्याचे काम संथपणे सुरू असल्याचे सोमनाथ कडू या ग्रामस्थाने सांगितले. रस्त्याची रुंदी वाढली असली तरी अपूर्ण कामामुळे अर्धाच रस्ता वापरण्यास मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात कामास उशीर होण्याचे कारण देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानोबा बेलापट्टी यांनी नाल्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहात असल्याने काम करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. पावसाने उघडीप दिल्यास अवघ्या आठवडय़ात हे काम पूर्ण करण्यास संबंधित ठेकेदारास सूचना करण्यात येईल, असे ते म्हणाले.