नवी मुंबई पालिका क्षेत्रात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने ९१ पैकी ७७ ठेकेदारांची नियुक्ती केली असून या वाढीव ठेकेदारांच्या सेवेत नोकरी मिळविण्यासाठी तीन लाख रुपये ठेकेदाराला लाच द्यावी लागत असल्याची धक्कादायक बाब दस्तुरखुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनीच जनता दरबारात जाहीर केली. वाढीव ठेकेदारीत शंभरपेक्षा जास्त कामगार कामाला लागणार असून ठेकेदारांचे यामुळे चांगभलं होणार आहे. कंत्राटी पद्धतीने असणाऱ्या या कामात पालिकेत नोकरी मिळण्याचे समाधान मिळत असल्याने बेरोजगार घरातील दागिने विकून ही नोकरी पदरात पाडून घेत असल्याचे दिसून येते. अतिरिक्त दहा ठेकेदारांकडे सुमारे ३०० कामगार जादा लागणार असल्याने यात तीन कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नवी मुंबई पालिकेत सहा वर्षांनंतर साफसफाई कंत्राटाची निविदा काढण्यात आली. यापूर्वी सहा वर्षे या कामाला केवळ मुदतवाढ देण्याचे काम केले जात होते. या ठेकेदारीत पहिल्यापासून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचा भरणा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांची प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनाही आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या मक्तेदारीमुळे काही ठेकेदार आणि कामगार मुजोर झाले आहेत. त्यांना पर्याय म्हणून मध्यंतरी दोन परिमंडळासाठी दोन ठेकेदार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या दोन ठेकेदारांची वार्षिक उलाढाल कोटय़वधी रुपयांची असावी, अशी अट टाकली जाणार होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त ठेकेदार बाद होणार होते. अखेर प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी पालिकेचे सर्वेसर्वा पालकमंत्री गणेश नाईक यांना साकडे घातले. त्यामुळे त्यांनी ही प्रक्रिया थांबविली. त्यानंतर या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. सध्या ८१ ठेकेदार आणि त्यांचे २२०० कामगार शहराची दैनंदिन साफसफाई करीत आहेत. त्याऐवजी ही ठेकेदार संख्या ९१ करण्यात आली असून वाढलेल्या दहा ठेकेदारांकडे सुमारे तीनशे साफसफाई कामगार नव्याने लागणार आहेत. या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील जाचक अटीवर काँग्रेसने आक्षेप घेतला व मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश मुंबई पालिकेला दिले. त्यात साफसफाई कामाची निविदा योग्य असून जाचक अटी वगळण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे पालिकेने ही प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीत ९१ पैकी ७७ ठेकेदारांच्या कामांना मंजुरी घेतली. शुक्रवारी ही सभा झाली. त्याच्या एक दिवस अगोदर वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात झालेल्या नाईक यांच्या जनता दरबारात एका साफसफाई कामगाराचा दर तीन लाख रुपये असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. यापूर्वी ठेकेदारी पद्धतीने लावण्यात आलेल्या काही कामगारांनी ३० ते ८० हजार रुपये दिल्याची माहिती उपलब्ध आहे पण आता हा दर वाढला असून एका कामगाराला तीन लाख रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने असणाऱ्या या कामासाठी कमी शिकलेले काही प्रकल्पग्रस्त हे तीन लाख रुपये मोजत असल्याचे समजते. यात पालिकेत नोकरीला आहे, असे सांगून या मुलांची लग्ने होत असल्याचे समजते. नव्या निविदेत दहा ठेकेदारांची संख्या वाढली आहे. एका ठेकेदाराकडे सरासरी वीस कामगार लागणार असून त्याने या दराने कामगार भरती केल्यास त्याला घरबसल्या ६० लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर कामगारांच्या कमाईवर हात मारून ठेकेदार मलई खातात ते वेगळेच. त्यामुळे काम मिळाल्यानंतर एका झटक्यात ५० ते ६० लाखांची कमाई कंत्राटदाराची होणार आहे. यात काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा हिस्सा ठेवला जात आहे. सरासरी ३०० अतिरिक्त नोकर भरतीत कंत्राटदारांची तीन कोटींपेक्षा जास्त कमाई होणार आहे. त्यामुळे आयुष्यभर नोकरी करण्यापेक्षा पालिकेचे साफसफाई कंत्राट घेतले तरी चालेल, असा एक विचार काही अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.