मंडलिक रविवारी भूमिका जाहीर करणार

काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे सांगितले जात असले तरी खासदार सदाशिवराव मंडलिक हे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मंडलिक हे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे.

काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे सांगितले जात असले तरी खासदार सदाशिवराव मंडलिक हे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मंडलिक हे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त खासदार मंडलिक नवी दिल्लीत होते. दरम्यान, खासदार राजू शेट्टी व मंडलिक यांच्यात चर्चा झाल्याने मंडलिक महायुतीकडे झुकणार या चर्चेला ऊत आला. मंडलिक यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असेही सांगितले जाऊ लागले. तथापि कोल्हापूर लोकसभा संघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच या मतदारसंघाची कसून बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. देवणे यांच्या गळय़ातच लोकसभेची उमेदवारी पडेल, अशी शक्यता होती. याच वेळी शिवसेनेकडून अन्य एखादा उमेदवार निवडणूक लढवेल का याचीही चाचपणी केली जात होती. त्यामुळे शिवसेनेला लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उपऱ्या उमेदवारावर अवलंबून राहावे लागणार होते. मंडलिक यांनी महायुतीकडून निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास त्यांना शिवसेनेत प्रवेश करणे अपरिहार्य ठरणार आहे.
शिवसेनेची उमेदवारी घेऊनच ते लोकांसमोर जाणार असल्याने त्यांचा पुरोगामी चेहरा हा बेगडी असल्याचे उघड होणार आहे. शिवाय ते थेट शिवसेनेत गेल्याने त्यांना काँग्रेसमधून अंतर्गत होणारी मदतही मिळण्याची शक्यताही नाही. केवळ आपल्या विचारात न घेता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे दिला आणि तेथे धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळणार याचा जळफळाट मंडलिकांना होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. धनंजय महाडिक यांना राजकीय क्षेत्रात उपरा ठरविण्यापर्यंत मंडलिक यांनी कडवट टीका केली होती. पण लोकसभा निवडणुकीत मंडलिक शिवसेनेकडून उभे राहिल्यास तेही या पक्षात उपरेच ठरणार आहेत. यामुळे महायुतीकडे झुकण्याचा मंडलिकांचा निर्णय कितपत फायदेशीर ठरणार याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. या सगळय़ा राजकीय हालचालींमध्ये मंडलिक गटाची भूमिका गोंधळाची बनली आहे. कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था दिसून येत आहे. पुरोगामी राजकारण केलेल्या मंडलिकांनी शिवसेनेचा भगवा हाती घ्यावा का, असा मुद्दाही कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर खासदार मंडलिक यांनीच कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन पुढील राजकीय दिशा निश्चित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रुईकर कॉलनी येथील मंडलिक यांच्या निवासस्थानी उद्या (रविवारी) दुपारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यातील निर्णय मंडलिक यांच्या राजकीय वाटचालीस कलाटणी देणारा ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mandlik will be announced role on sunday

ताज्या बातम्या