अतुल कुलकर्णी आपल्या प्रत्येक चित्रपटाचा चहूबाजूने विचार करणारा असा गुणी, मेहनती व चतुरस्र अभिनेता आहे, असा त्याला भेटल्यावर नेहमीच प्रत्यय येतो. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘पोपट’ या चित्रपटाच्या निमित्ताने भेटला असता त्याच्या याच गुणाचा पुनप्र्रत्यय आला.. तो सांगत होता, ‘प्रेमाची गोष्ट’नंतर काहीसा लगेचच माझा हा ‘पोपट’ चित्रपट येत आहे. एकाच दिग्दर्शकाचे दोन चित्रपट असे माझ्याबाबत प्रथमच घडते आहे. पण चित्रपट स्वीकारताना मी सर्वप्रथम कथेला प्राधान्य देतो. त्यानुसार ‘पोपट’ची कथा मला आवडली, मी होकार दिला. दिग्दर्शकाशी सूर जुळणेदेखील मला खूप महत्त्वाचे वाटते. त्याशिवाय तो चित्रपट नीट आकाराला येत नाही. ते येथे घडले, पण चित्रपट पूर्ण झाल्यावर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे, प्रसार माध्यमातून मराठी  चित्रपट योग्यरीत्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवा व दुसरे म्हणजे मराठी चित्रपटाचे वितरण व्यवस्थित होणे गरजेचे असते. अर्थात या दोन्हींसाठी वेळेचे नियोजन करणेही गरजेचे असते. ‘पोपट’साठी हे आवर्जून केले जात आहे, अतुल कुलकर्णीने अगदी विश्वासाने सांगितले. दिग्दर्शक सतीश राजवाडेने तर या वेळी सांगितले, ‘पोपट’ प्रेक्षकांपर्यंत आणण्याच्या सर्व प्रकारच्या तयारीसाठी तब्बल पंचेचाळीस दिवस बाजूला काढले असून, तेवढे ते गरजेचेही आहे. अन्य प्रकारच्या घटना व त्यांच्या बातम्या यांच्या भडिमारात आपला चित्रपट हरवू न देणे गरजेचे आहे, असे वाटते.