दारू सोडण्याची इच्छा असेल तसेच दारू ही ज्या कुटुंबीयांसाठी समस्या असेल, अशा नागरिकांमध्ये मद्यपानाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सिडको येथील अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस एकता समूह या संघटनेतर्फे रविवारी सिडकोत ‘मद्यमुक्तीचा मार्ग- एक अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’ या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस ही मद्यपी असलेल्या व्यक्तींची संघटना आहे. संघटनेचे सभासद आपले मद्यपानाच्या काळातील अनुभव एक दुसऱ्यांना सांगतात व दारूपासून दूर राहतात. अनुभवकथनामुळे सभासदांचे मानसिक धैर्य वाढते. नवागताला जीवनाची आशा स्फुरते. स्वत: दारूपासून दूर राहणे व ज्यांना दारूपासून दूर राहण्याची इच्छा आहे, अशा मद्यपींना दारूपासून दूर राहण्यास मदत करणे हे ध्येय बाळगून सभासद कार्य करत आहेत. संघटनेत सामील होण्यासाठी फक्त दारूपासून दूर राहण्याची इच्छा असणे गरजेचे होय. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. नाशिकमध्ये एकता समूहाचे २७ वर्षांपासून कार्य सुरू आहे. सिडकोत पवननगर येथील के.बी.एच. विद्यालयाजवळ समूहातर्फे चार वर्षांपासून या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे. हे कार्य अधिक प्रखर होण्यासाठी रविवारी जनजागृती सभा होणार आहे. संभाजी स्टेडियमजवळील मायको सभागृहात सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत ही सभा होणार आहे. व्यक्ती दारू का पितो, दारू कशा पद्धतीने थांबविता येते, यासह अनेक कारणांचा उलगडा या सभेत होणार आहे. या सभेस दारू सोडू इच्छिणाऱ्यांसह इतरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९०७५७५७४१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.