मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष प्राधिकरण म्हणून कार्यरत असलेल्या एमएमआरडीएने आपल्या अधिकाऱ्यांच्या देशी आणि परदेशी अभ्यास दौऱ्यांकरिता आतापर्यंत चार कोटी २९ लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीए प्रशासनाने उदार होत राज्याचे मंत्री, मुख्य सचिव, नगरविकास सचिव, पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक आणि मंत्र्यांच्या खासगी सचिवांनादेखील परदेशी दौऱ्यांवर नेत कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २००१ ते २०१४ या वर्षांत एमएमआरडीएने विविध व्यक्तींच्या देशी-परदेशी बैठकांकरिता किती खर्च आला याची माहिती मागविली होती. यानुसार एमएमआरडीएने देशांतर्गत ६२६ बैठका, अभ्यास व अन्य कारणासाठी प्रवास करत १,४२,३८,४३१ रुपये खर्च केले होते.
देशाबाहेर म्हणजे परदेशात ३९ स्थानी करण्यात आलेल्या विमानवारीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील मंत्री, नगरविकास सचिव, बेस्ट महाव्यवस्थापक आणि मंत्र्यांच्या खासगी सचिवांनीदेखील विदेशवारीची संधी साधली होती.
 एमएमआरडीएचे आयुक्त, उपायुक्त किंवा इतर अधिकारी यांच्या परदेशवारीचे समर्थन करता येईल, परंतु या अभ्यासदौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या खासगी सचिवांचे काय काम असा प्रश्न उपस्थित होतो. गलगली यांनी या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांना पत्र लिहून या दौऱ्यांवरील खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दौऱ्यांवर झालेला खर्च
* सर्वात जास्त म्हणजे ४९,१८,५४७ इतकी रक्कम नोव्हेंबर २००५मध्ये झालेल्या १४ दिवसांच्या मलेशिया,चीन,कॅनडा, अमेरिका, जपान, शांघाय, टोकियो आणि टोरंटो इथल्या तुलनात्मक वाहतूक अभ्यास कार्यक्रमासाठी खर्च झाली होती. यात राज्यमंत्री राजेश टोपे,सुनील देशमुख, राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत रामानंद तिवारी, संजय उबाळे, बेस्ट महाव्यवस्थापक स्वाधीन क्षत्रिय, उपसचिव सुधाकर नांगनुरे, डॉ.टी. चंद्रशेखर, पीआरके मूर्ती आणि नगरविकास राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव सी. एस. थोरात यांचा समावेश होता. त्यानंतर स्वित्र्झलड, स्वीडन, फ्रान्स आणि जर्मनी येथील दौऱ्यात पुन्हा नगरविकासमंत्री राजेश टोपे, तत्कालीन     महापौर शुभा राऊळ, मुख्यमंत्र्यांचे सचिव सी. एस. संगीतराव, उपसचिव सुरेश कंकाणी, शंकर देशपांडे तसेच पालिकेतील नगरसेवक आशीष शेलार व राजेश सिंह हे सहभागी झाले होते.
* शहरनियोजन, वाहतूक व मालवाहतूक आणि शहरी विकास अशा कारणांसाठी  ४९,०७,६८७ रुपये खर्च केले गेले. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपले खासगी सचिव नितीन करीर, मुख्य सचिव जे. पी. डांगे आणि प्रधान सचिव टी.सी. बेंजामिन यांच्यासोबत अमेरिका, मलेशिया, सिंगापूर येथे केलेल्या     विमानवारीवर ४३,३४,१७७ रुपये खर्च     झाले होते.
* एमएमआरडीएचे महानगर आयुक्तराहुल अस्थाना आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर २०,२३,५१७ रुपये खर्च झाले होते. तर वॉशिंग्टन आणि लंडनच्या     एका अभ्यास दौऱ्यावर १९,८९,८३६ रुपये खर्च करण्यात आले होते. यात नगरविकास प्रधान सचिव टी.सी. बेंजामिन, अश्विनी भिडे, एसव्हीआर श्रीनिवासन आणि पीआरके मूर्ती यांचा समावेश होता. अशा अनेक परदेशी दौऱ्यांचा उल्लेख करता येईल.