शहरातील अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्याचा साठा सार्वजनिक वितरणासाठी जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या दुकानांमध्ये पाठविण्यात आल्यानंतर व्यवस्थित ताळमेळ लागत नसल्याने तसेच त्यात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाची पुरवठा विभागाने गंभीर दखल घेतली आहे. पुरवठा विभागाच्या मुख्य सचिवांनी भरारी पथकामार्फत मनमाडच्या अन्न महामंडळासह जिल्ह्य़ातील सर्वच गोदामांची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य पुरवठय़ात अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी याआधीही अनेक वेळा करण्यात आल्या आहेत. परंतु या तक्रारींकडे पुरेशा प्रमाणात वरिष्ठांकडून लक्ष देण्यात न आल्याने असे गैरप्रकार वेगवेगळ्या पद्धतीने होतच राहिल्याचे म्हटले जाते. पाच कोटी रुपयांच्या धान्याचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार सुरगाणा भागात अलीकडेच उघडकीस आला. पाच कोटींचा गहू, साखर, तांदूळ यांसह इतर धान्याचा अपहार झाल्यानंतर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनमाडच्या गोदामातून धान्य पाठविल्यानंतर प्राप्त धान्याची व वितरणाची तपासणी करण्यात आली. त्यात गोदामातील साठय़ाचा ताळमेळ लागत नसल्याने वितरणाचा हिशेबही नाही. जबाबदार अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मनमाड येथील अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्य वितरित झाल्यानंतर पुढे त्याचा नाशिक जिल्ह्य़ात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे बायोमेट्रिक प्रणाली राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे गोदामातून धान्य घेताना दुकानदार आणि वाहन चालकांच्या बोटांचे ठसे घेतले जातील. गैरवर्तणूक करणाऱ्या कोणालाही मोकळे सोडले जाणार नाही. पोलीस अधीक्षकांमार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, आता पुरवठा विभागाच्या मुख्य सचिवांनी पाठविलेल्या भरारी पथकामार्फत जिल्ह्य़ातील सर्व गोदामांची तपासणी करण्यात येणार असली तरी याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या तपासणीनंतर जिल्ह्य़ात मनमाडच्या गोदामातून वितरित झालेल्या धान्यसाठय़ाच्या वितरणातील मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.