*  दुसऱ्या दिवशीही दुकाने व घरांमधून पाणी काढण्याचे काम
*  तुंबलेल्या गटारी व  अतिक्रमणांमुळे ठिकठिकाणी तलावाचे स्वरूप
नैसर्गिकपणे पाणी वाहून नेणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि तुंबलेल्या गटारी, याची परिणती पहिल्याच पावसात शहरातील अनेक प्रमुख रस्ते व परिसर पाण्याखाली जाण्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रमुख रस्त्यांवर दुभाजकामुळे एका बाजूस अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. खुद्द महापालिकेच्या मुख्यालयासह गंगापूररोड, उंटवाडी, नाशिकरोड, सराफ बाजार, गणेशवाडी, सिडको आदी भागातील दुकाने आणि घरांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सलग दुसऱ्या कठोर प्रयत्न करावे लागले. गुरूवारी रात्री अवघ्या तासाभराच्या काळातच पावसाने अक्षरश: दाणादाण उडविली असताना पालिका यंत्रणेने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे सिद्ध झाले. पुढील काळात सलग काही तास पाऊस झाल्यास काही वर्षांपूर्वी मुंबईकरांनी अनुभविलेल्या जलप्रपाताचे संकट नाशिककरांवर कोसळणार असल्याचे यामुळे दिसत आहे. दोन दिवस दडी मारणाऱ्या पावसाचे दमदार स्वरूपात आगमन झाले खरे, परंतु त्याने पालिका यंत्रणा व तिच्या अखत्यारीतील आपत्ती निवारण कक्षाचे पितळ उघडे पाडले. साधारणत: तासाभरात ६० मिलीमीटर पाऊस कोसळला. अल्पावधीतच मध्यवर्ती भागातील व्यापारी पेठा, प्रमुख रस्ते, दुकाने, तळ मजल्यावरील घरे व व्यापारी आस्थापनांमध्ये पाण्याचे लोटच्या लोट वाहू लागले. यापूर्वी ज्या भागांत कधी इतक्या प्रमाणात पाणी साचले नव्हते, असे सराफ बाजार, मेनरोडकडून दहीपुलाकडे जाणारा रस्ता, नाशिकरोड भागातील काही परिसर अशा ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. राजीव गांधी भवनसमोरील शरणपूर रोड, उंटवाडी, केटीएचएमसमोरील उड्डाणपूल, गंगापूर रस्ता या भागात दरवर्षी ही समस्या उद्भवत असूनही त्यावर तोडगा काढण्याचा पालिकेकडून कोणताच प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. कॉलेजरोड, गंगापूररोड सारख्या अनेक रस्त्यांवर लांबच लांब दुभाजक उभारण्यात आले आहेत. हे दुभाजक पावसाचे पाणी वाहून जाण्यास मुख्य अडथळा ठरले. मल्हार खाण ते थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यापर्यंत गंगापूर रस्त्यावरील एका बाजूकडून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. तशीच स्थिती पुढे डोंगरे वसतीगृहासमोरील रस्त्यावर होती. परिणामी, गंगापूर रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी स्थानिकांनी पुढाकार घेऊन बंद केली. उंटवाडी आणि नाशिकरोडमधील नवले चाळ परिसरात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती.
वास्तविक, पावसाचे पाणी थेट नदीपात्रात वाहून नेण्यासाठी महापालिकेने पावसाळी गटार योजनेवर कोटय़वधींचा निधी खर्च केला आहे. इतका निधी खर्च होऊनही पावसाचे पाणी काही केल्या वाहून जाऊ शकले नाहीच, शिवाय याआधी कधी अनुभवयास न येणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक गटारी तुंबलेल्या असल्याने पाणी सरळ रस्त्यावरून वाहत होते. पावसाळी गटार आणि जे थोडेफार नाले शिल्लक आहेत, त्यांची साफसफाई झाली नसल्याने गटारी व नाल्यांमधून पाणी बाहेर येत होते. नैसर्गिक नाल्यावर झालेली विविध स्वरूपाची अतिक्रमणे त्यास तितकीच जबाबदार आहेत.
नाले व ओहोळ बुजविण्याची किमया यापूर्वी झाली असल्याने रस्त्या-रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिले. पाच वर्षांपूर्वी शहराला महापुराने धडक दिल्यानंतर शहरात जी बिकट स्थिती निर्माण झाली होती, त्याची अनुभूती शहरवासीयांना तासाभराच्या पावसाने आली. त्यावेळची परिस्थिती एका विशिष्ट भागात होती, यावेळी मात्र संपूर्ण शहरातच अशी परिस्थिती होती. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पालिकेचा आपत्ती निवारण विभागाचा कुठे मागमूसही दिसला नाही. दुसऱ्या दिवशी ही यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या दुकानांमध्ये पाणी शिरले ते पंपाच्या मदतीने बाहेर उपसण्याचे काम यंत्रणेकडून सुरू झाले. पालिकेला पावसाळापूर्व करावयाच्या कामांचा विसर पडल्याचे या पावसाने दाखवून दिले. काही वर्षांपूर्वी मिठी नदीच्या पाण्याने मुंबईत जलप्रपात घडविला होता. पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात असे अडथळे निर्माण करण्याची प्रक्रिया कायम राहिल्यास नाशिककरही तशा संकटातून सुटण्याची शक्यता नाही.

अवघ्या १५ ते २० मिनिटात प्रचंड पाऊस झाल्यामुळे शहरातील काही रस्ते व भाग पाण्याखाली बुडाल्याचा दावा पालिकेच्या आपत्ती निवारण कक्ष तथा अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांनी केला. पाणी वाहून नेणारी व्यवस्था आणि पडलेला पाऊस यांच्यात तफावत असल्याने ही स्थिती उद्भवली. अचानक मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा झाला नाही आणि हे पाणी रस्त्यावर वा इतरत्र वाहू लागले. शहरातील आठ ते दहा ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर अध्र्या तासात सर्व पाण्याचा निचरा झाल्याचेही महाजन म्हणाले. वास्तविक पावसाचे प्रमाण कमी झाल्यावरही अनेक भागात कित्येक तास पाणी साचले होते. गंगापूर रस्त्यावर तर काही ठिकाणी एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली. परंतु, महाजन यांनी ही बाब नाकारली. पावसावेळी पालिकेची यंत्रणा कार्यप्रवण राहिल्याचा दावाही त्यांनी केला. पावसामुळे निर्माण झालेली स्थिती आपत्ती निवारण कक्ष व अग्निशमन विभागाने योग्य पद्धतीने हाताळली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. नाशिकरोड परिसरात सेंट झेविअर्स स्कूलची भिंत कोसळली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. या सर्व ठिकाणी अग्निशमन विभागाने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पडलेली झाडे बाजूला हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले. ४० ते ५० ठिकाणी पालिकेची मदत पोहोचली. घर व दुकानांमध्ये शिरलेले पाणी पंपाच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम रात्रीच हाती घेण्यात आले. पहिल्या पावसात निदर्शनास आलेल्या त्रुटी लक्षात घेऊन इतर विभागांच्या मदतीने त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तुंबलेल्या पावसाळी गटारांची साफसफाई वा तत्सम कामे पुढील चार ते पाच दिवसात केली जातील, असेही महाजन यांनी नमूद केले. पावसाचे पाणी वाहून नेण्यात पावसाळी गटार योजना निष्भ्रम ठरली. त्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाली काय, यावर महाजन यांनी काही बोलण्यास नकार दिला.

जिल्ह्यत एका दिवसात ४६७.५ मिलीमीटर पाऊस
पावसाने संपूर्ण नाशिक जिल्हा व्यापला असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४६७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात तर सर्वात कमी येवला तालुक्यात झाला. नाशिक तालुक्यात ६० मिलीमीटर, इगतपुरी ३४, दिंडोरी ३९, पेठ १२, त्र्यंबकेश्वर ४२, मालेगाव ५८, नांदगाव २९, चांदवड १८.५, कळवण १६, बागलाण ६०, सुरगाणा ४, देवळा १८, निफाड २३, सिन्नर ४९, येवला ५ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षांत प्रारंभीच असा दणक्यात पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे.