नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील बळींच्या वारसांचे पुनर्वसन व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण न केल्याची आपबीती नक्षली हल्ल्यात ठार झालेले केवल अतकमवार यांची मुलगी अश्वनी अतकमवार व बहादुरशाह आलाम यांचा मुलगा संतोष आलाम यांनी पत्रकार परिषदेत कथन केली.
गडचिरोली जिल्ह्य़ात गेल्या तीन-चार वर्षांत नक्षल्यांच्या हिंसेत ४०च्या वर बळी गेले असून त्यांना केंद्र शासनाच्या निधीतून देय असलेले अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. सर्व पीडितांना मिळून द्यावयाची ही रक्कम दीड कोटीपेक्षा जास्त नाही. कोणतेही ठोस कारण नसताना हे प्रस्ताव गृहविभागाकडे पडून आहेत. केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच एक कारण या विलंबामागे असू शकते, असा आरोप करून गडचिरोली जिल्हा राज्याच्या टोकावर असल्याने व पीडित व्यक्ती या अर्धशिक्षित आदिवासी असल्याने शासन ही दफ्तर दिरंगाई करीत असल्याचे शोधयात्री अरविंद सोवनी यांनी याप्रसंगी सांगितले.
नक्षलवाद ही महाराष्ट्राची मोठी समस्या आहे. गडचिरोली जिल्ह्य़ाचा तो मोठा कर्करोग आहे. सामान्य नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसेचा वार झेलत आहेत. कोणतीही चूक नसताना नागरिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचे बळी पडत आहेत त्यांचे  वारसदार दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत. या विषयावर दिला जाणारा निधीचा केंद्र सरकारकडून परतावा मिळत असतो. त्यामुळे त्याचा भार राज्य शासनावर पडणार नाही. असे असून सुद्धा सरकार हा निधी देत नाही. याबाबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व गृहमंत्रालयातील अधिकारी, तसेच राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांना विनंतीपत्रे पाठवली आहेत. त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. नक्षलवादी हल्ल्यातील बळींच्या वारसांना न्याय मिळाला नाही तर गडचिरोली जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा घेऊन व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही सोवनी यांनी याप्रसंगी दिला. यावेळी प्रा. दत्ता शिर्के व प्रा. रश्मी पारसकर उपस्थित होते.