लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले, तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना स्थान मिळावे, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीतील मंडळी करीत आहे. विशेषत: जालना आणि औरंगाबाद या दोन जागांसाठी राष्ट्रवादी इच्छुक आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन वेळा फटका बसला. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. या अनुषंगाने काही बोलणे आताच अपरिपक्वपणाचे ठरेल. मात्र, जालना लोकसभेच्या जागेसाठी जोर लावणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
जालना लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्यावर विजय मिळविला होता. रावसाहेब दानवे यांना ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली होती, तर डॉ. काळे यांना ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. ही जागा लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. जालन्याची जागा पदरात पाडून घ्यायची असेल तर दोन जागांचा दावा करणे राजकीयदृष्टय़ा सोयीचे असल्याने औरंगाबाद आणि जालना या दोन जागांवर राष्ट्रवादीने डोळा ठेवला आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना २ लाख ५५ हजार ८९६ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंग पवार यांना २ लाख २२ हजार ८८२ मते मिळाली. ही लोकसभा निवडणूक एका अर्थाने तिरंगी झाली होती. शांतिगिरीमहाराज यांना १ लाख ४८ हजार मते मिळाली होती. या मतांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजयी होऊ शकते, असा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण उत्सुक आहेत. तर जालन्यात ही जागा राष्ट्रवादीचे अंकुशराव टोपे यांच्यासाठी सुटावी, असे प्रयत्न केले जात आहेत.