साहित्य, कला व संस्कृतीने आजवर केवळ स्त्रियांच्या दु:खाचीच चर्चा केली. त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी स्त्रीचा संघर्ष, त्याग, भावभावना आणि तिच्या जगण्याचे बहुआयामी पदर उलगडून दाखविल्याखेरीज तिचे जगणे समृद्ध होणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी केले.
येथील समता प्रतिष्ठानच्या प्रागतिक विचार व्याख्यानमालेत ‘कथा भेटली कवितेला’ या विषयावर डॉ. तडेगावकर यांनी विचार मांडले. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात डॉ. तडेगावकर यांना कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांनी साथ दिली. स्त्री कोणतीही असो, सर्वच स्तरातील स्त्रियांचे भावविश्व समजून तिच्या अस्तित्वाची वाट पुरुषांनी जाणीवपूर्वक मोकळी करून दिली पाहिजे, असे डॉ. तडेगावकर यांनी सांगितले.  स्त्रीची जात, धर्म, स्थळ, युग कुठलेही असो, तिचे चौपदरी शोषण होत राहिले व होत आहे. आज तिच्या शोषणाच्या काही पद्धती बदललेल्या दिसत असल्या, तरी ती पुरुष वर्गाने निर्माण केलेल्या परिस्थितीपुढे हतबल झाली आहे. शिक्षणाने काही बदल झाल्याचे चित्र दिसत असले तरी तिचा संघर्ष मात्र अनेक पटींनी वाढला आहे. काही काळापूर्वी तिचा संघर्ष कुटुंब आणि सभोवतालशी होता, आता तो समाजासोबत आणि स्वत:सोबतही सुरू असल्याने तिच्या जगण्याचा प्रवास तिला दमवणुकीचा ठरत असल्याचे त्या म्हणाल्या. व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांच्या हस्ते एका कुंडीतील झाडाला पाणी घालून करण्यात आले. प्रा. पाटील यांनी येवल्यासारख्या मागास भागात शिक्षणाबरोबरच संस्थेच्या वतीने व्यापक प्रबोधनाचे काम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी यांनी अशा प्रबोधनाच्या चळवळी अधिक गतिमान करण्याची आवश्यकता व्यक्त केली. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी शिक्षणाबरोबरच समाजातील परिवर्तनवादी विचाराला बळ देण्याचे काम व्याख्यानमालेद्वारे करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामनाथ पाटील यांनी केले.