प्रेमाच्या नात्यात येणाऱ्या संशयाचा गडबडगुंडा दर्शवणारा ‘संशयकल्लोळ’ हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून (५ एप्रिल) प्रदर्शित होत आहे. आशा, जयसिंह, श्रावणी आणि धनु या चौघांच्या प्रेमामुळे निर्माण झालेला संशय व त्यामुळे नात्यांत होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. मराठीतील यच्चयावत सर्वच गुणी कलावंत या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहेत. हलकाफुलक्या विनोदी चित्रपटांची लाट पुन्हा एकदा मराठीत सुरू झाली असून त्यातलाच हा एक चित्रपट आहे. अमोल पालेकरांचा ‘वुई आर ऑन होऊन जाऊ द्या’ प्रमाणेच हलकाफुलका विनोद, प्रासंगिक विनोदाची फोडणी असलेले हे चित्रपट आहेत.
काही काही विषय पिढय़ानुपिढय़ा चालत येतात, कधीही न संपणारे असतात. वेगवेगळ्या काळात स्त्री-पुरुष नाते, नवराबायकोचे नाते असो की मित्रमैत्रीणींचे नाते असो संशयाचे भूत मानगुटीवर बसण्याची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे अनेकदा आपण नाटक, मालिका, चित्रपटातून पाहिलेला विषय असला तरी दिग्दर्शक  नवा आहे. त्यामुळे दिग्दर्शकाची विषयाची समज, मांडणीतील नावीन्य या गोष्टी नव्या असतात. त्यामुळे विषय जुना असला तरी आजच्या काळाला अनुसरून आजच्या पिढीच्या प्रेक्षकांना आवडेल अशा प्रकारची हाताळणी अपेक्षित आहे.
अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, विजय पटवर्धन सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, क्षिती जोग, गौरी निगुडकर, ओमकार गोवर्धन, अभिजीत साटम, रिमा लागू, सुलेखा तळवलकर, शुभांगी दामले, श्रीरंग देशमुख यांच्याबरोबरच स्वत: दिग्दर्शक विशाल इनामदार यांनीही भूमिका केली आहे.
विजय पटवर्धन आणि संजय मोने यांनी संवादलेखन केलेल्या या चित्रपटाची पटकथा विजय पटवर्धन यांच्या संगतीने विशाल इनामदार यांनी लिहिली आहे. सुरेश देशमाने यांचे छायालेखन असलेला हा चित्रपट हलक्याफुलक्या विनोदाची परंपरा पुढे नेणारा असेल.
 श्री स्वामी समर्थ पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल इनामदार यांचे आहे. चित्रपटाला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. वैभव जोशी व अशोक बागवे यांनी चित्रपटाची गिते लिहिली असून, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, निहिरा जोशी यांनी ती गायली आहेत. छायांकनाची जबाबदारी सुरेश देशमाने यांनी सांभाळली आहे.