नवी मुंबईचाच भाग असलेल्या उरण तालुक्यातून मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने बससेवा सुरू केल्याने उरणच्या प्रवाशांची सोय झाली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता उरण पूर्व भागातही सेवा सुरू करण्यात आली. आता वाशी ते उरण या मार्गावर ३७ क्रमांकाची वातानुकूलित बससेवाही सुरू केली आहे. त्यामुळे उरण मधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. वाढत्या उरणच्या गरजा लक्षात घेता येथील दळणवळणासाठी जादा बसेसची आवश्यकता आहे. येथील प्रवाशांना एसटी बसेस, एनएमएमटीची सेवा सुरू आहे. तरीही ही सेवा अपुरी पडत असल्याने खासगी जिप्स तसेच रिक्षाही या मार्गावर चालत आहेत. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाल्याने नवी मुंबईत जाण्यासाठी नवी मुंबई ते कोप्रोली अशी बससेवा सुरू करण्याची मागणी येथील प्रवाशांकडून केली जात होती. त्यानुसार एनएमएमटीने या मार्गावरील बससेवा सुरू केली आहे.