औरंगाबादचा औद्योगिक विकास सर्वागाने झाला व होत आहे. अनेक नव्या बाबींची सुरुवात औरंगाबादपासूनच झाली. जगातील ७२ देशांत निर्यात करणाऱ्या औरंगाबादने जागतिक पातळीवर स्पर्धेत उतरून अनेक नवनवीन कामे, ऑर्डर्स मिळविल्या. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज परिधान केलेल्या औरंगाबादला औद्योगिकदृष्टय़ा मात्र यथायोग्य न्याय मिळाला नाही, त्याचे मूल्यमापन त्याच्या कामगिरीला अनुसरून झालेच नाही, असा सूर उद्योगजगतातील मान्यवरांनी व्यक्त केला.
‘नेटवर्क १८’ यांच्या वतीने व औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ‘इंजिनिअरिंग एक्स्पो २०१३’च्या निमित्ताने हॉटेल ताज येथे ‘ट्रेड, ट्रेंडस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीज – गॉजिंग औरंगाबाद ऑन क्रिटिकल पॅरामीटर्स’ विषयावर परिसंवाद झाला.
निर्लेप उद्योगसमूहाचे राम भोगले, डीआयसीचे सरव्यवस्थापक एस. जी. राजपूत, एक्स्पोर्ट ग्लोबल सोल्युशन्सचे संचालक आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे संचालक पी. उदयकुमार, संजीव ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चर्स प्रा. लि.च्या संचालक मैथिली तांबोळकर यांनी यात सहभाग घेतला.  नेटवर्क १८ पब्लिकेशनच्या संपादक अर्चना नायडू यांनी वक्त्यांना विविध प्रश्नांच्या माध्यमातून बोलते केले.