महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, नगरसेवक किरण कदम यांच्यासह शिवाजी सहकारी बँकेच्या आजीमाजी ३५ संचालकांना कलम ८८ अन्वये नोटीस बजावली आहे. या सर्वावर २ कोटी ८७ लाख कर्जाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सहकार निबंधक रंजन लाखे यांनी सोमवारी दिली.     
गडहिंग्लज येथील शिवाजी सहकारी बँक दोन वर्षांपूर्वी बंद पडली आहे. या बँकेवर अध्यक्ष रंजनलाखे, सहायक निबंधक ए. एच. भंडारे, एस. बी. सोनवणे यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सोमवारी बँकेच्या ठेवीदारांची बैठक घेतली. त्यांनी ठेवीदारांना ठेवीचे पूर्णपणे संरक्षण देणार असल्याचे सांगितले.     
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रंजन लाखे म्हणाले, शिवाजी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या मिळकतींवर बँकेचे नाव नोंदविण्यात येणार आहे. याचबरोबर बँकेच्या टॉप शंभर कर्जदारांच्या मिळकतींची जप्ती केली जाणार आहे. त्यांचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल केली जाणार आहे.