ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून दोन दिवसाचे बाळ दगावल्याची घटना सोमवारी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये घडली. या घटनेनंतर बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला.
शांतीनगरात राहणाऱ्या संगीता मंगेश तिवाडे यांना प्रसुतीसाठी २८ जानेवारीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसुती झाल्यानंतर बाह्य़रुग्ण विभागात संगीता आणि तिच्या बाळाची तपासणी केल्यानंतर दोघांनाही वॉर्ड क्रमांक पाचमध्ये दाखल करण्यात आले. बाळाच्या नाकातील नळी डॉक्टरांनी काढून घेतली. बाळाचे वजन तीन किलो असल्यामुळे त्यांची प्रकृती चांगली होती. बाळाच्या काढलेल्या एक्सरेमध्ये काहीच आढळले नाही. दरम्यान, बाळाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला ऑक्सिजन आवश्यकता होती मात्र परिचारिकेने ऑक्सिजन नसल्याचे सांगितले. अर्धा तास बाळ ऑक्सिजनविना राहिले. शेजारी एका बाळाला ऑक्सिजन लावण्यात आले होते त्यामुळे त्याच सिलिंडरवर दोन बाळांना ऑक्सिजन देऊन उपचार सुरू करण्यात आले. बाळ झटके देत असताना मुलगा मंगेशला दूरध्वनी करून रुग्णालयात बोलावून घेतले. रात्री ९ वाजता बाळाचा हात बघितल्यावर तो थंड पडला होता. सिलिंडरसुद्धा संपले होते. दुसऱ्या सिलिंडरची मागणी केली, ते नसल्याचे सांगण्यात आले.  सिलिंडर संपल्यानंतर बाळाची प्रकृती बिघडत असल्याचे मंगेश निवासी डॉक्टरांना सांगण्यासाठी गेला असताना डॉक्टर मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होते. निवासी डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळाला तपासले.  बाळाला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र रात्री एक वाजता त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप मंगेश तिवाडे यांनी केला आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनेची तक्रार आली नाही, मात्र या गंभीर प्रकरणाबाबत उद्या बुधवारी चौकशी करणार आहोत. चौकशी केल्यानंतर काय झाले ते सांगता येईल. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू निस्वाडे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.