सदोष कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी घेऊन मुदतीनंतरही बांधकाम सुरूच ठेवणारे नगरपालिकेचे उपाध्यक्ष शेख निहाल हाजी शेख इस्माईल यांना हे बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिले. उमाशंकर जयस्वाल यांनी या बांधकामावर आक्षेप नोंदविला होता.
नगरपालिकाअंतर्गत सिटी सव्र्हे क्र. ४७११वरील बांधकामाचा मुद्दा जागेच्या मालकीवरून अनेक वर्षांपासून गाजत आहे. पालिकेचे विद्यमान उपाध्यक्ष शेख निहाल यांनी बांधकाम परवानगीसाठी दिलेल्या अर्जाप्रमाणे ३० मे २०१२ रोजी त्यांना बांधकाम करण्याची परवानगी मिळाली व त्यांनी बांधकाम सुरू केले. मात्र, या बांधकामाविरुद्ध उमाशंकर जयस्वाल यांनी आक्षेप सादर केला. हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारीवरून मुख्याधिकारी राठोड यांनी गेल्या ३० जुलै रोजी सिटी सव्र्हे क्र. ४७०८-७०९, ४७१० व ४७१२ या क्षेत्रावरील दाखल कागदपत्रावर पक्षकार व तक्रारकर्ता यांच्यासमक्ष सुनावणी घेतली.
दोघांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरून सिटी सव्र्हे क्र. ४७११ या जागेचे स्थान निश्चित होत नाही व मिळकतधारकाची मालकीहक्क सिद्ध करण्याचा अधिकार पालिकेला नसल्याने जयस्वाल यांनी मिळकतीचे स्थान निश्चित व क्षेत्र सक्षम प्राधिकरणाकडून निश्चित करून घ्यावे, असा निर्णय दिला. शेख निहाल यांना दिलेली बांधकाम परवानगीची मुदत संपली असल्याने व तत्कालिन मंजूर नकाशे सदोष असल्याने शेख निहाल यांनी दुरुस्त नकाशेसह सुधारित बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दाखल करावा, तोपर्यंत परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. तसेच जयस्वाल यांनी सिर्टी सव्र्हे क्र. ४७११वर अनधिकृत बांधकाम करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.