डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याबाबतच्या सीडी प्रकरणात पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी आज पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. डॉ. कांकरिया यांनी रुग्णालयातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा लैगिंक छळ केल्याचे चित्रिकरण त्या सी. डी. मध्ये असून तक्रारदार बलभीम भगत यांनी त्या त्यांच्याकडे पोस्टाने आले असल्याचे म्हटले आहे.
भगत यांनी यापुर्वीच डॉ. कांकरिया यांच्या विरोधात त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या त्यांच्या एका नातेवाईक महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. ते प्रकरण प्रलंबित असून आता भगत यांनी नव्याने त्यांच्याकडे आलेल्या त्या सी. डी. थेट पोलीस अधीक्षकांकडे दाखल केल्या असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून या सी. डी. ची चर्चा शहरात आहे. पत्रकार परिषद घेऊनच भगत यांनी त्याची जाहीर वाच्यता केली व डॉ. कांकरिया यांच्या चौकशीची मागणी केली. डॉ. कांकरिया यांनी याचा त्वरित इन्कार केला असून हा बदनामीचा डाव असल्याचे सांगितले. त्यांनी या सीडीची तांत्रिक सत्यताच फेटाळली आहे. ती पिडीत मुलगीही अद्याप फिर्याद वगैरे दाखल करण्यासाठी पुढे आलेली नाही. पोलिसांकडूनही दोन दिवस काहीच हालचाल झाली नाही, मात्र शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या सुरेखा भोसले, राजश्री शितोळे मनिषा गंधे, पद्ममाताई गागंर्डे व अन्य काही महिला सदस्या तसेच काँग्रेसच्या शिल्पाताई दुसंगे, अनु खोसे आदी महिलांनी पोलीस अधीक्षक शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी केली.
त्यामुळे आज शिंदे यांनी घुगे यांच्याकडे त्या सी. डी. तसेच तक्रारदार भगत यांचे निवेदन दिले व त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. घुगे यांनी सांगितले की सी. डी. ची तज्ञांकडून तपासणी करण्यात येईल तसेच भगत यांनाही बोलावून त्यांचे म्हणणे काय आहे ते सविस्तर समजावून घेतले जाईल.