शिर्डी व नगर दक्षिण हे दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ अदलाबदलीचे कारणच नाही. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे आहेत, ते काँग्रेसलाच मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
नगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची काँग्रेस आघाडी अंतर्गत अदलाबदलीबाबत चर्चा सुरू  आहे. यावर विखे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचेच आहेत. मतदारसंघ अदलाबदलीमध्ये आपला कुठलाही संबंध नाही. त्यामुळे हे दोन्हीही मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाले पाहिजे. राज्यातील लोकसभा मतदारसंघ जागावाटपाचा फॉर्म्युला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अद्याप जाहीर केलेला नाही. लोकसभेला काँग्रेस पक्षाबरोबरच राहण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आपण दुष्काळी दौरे केले त्या वेळी सर्व पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना या दौ-यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दौ-यात सहभागी झाले होते. या दौ-याचा व लोकसभा निवडणुकीचा कुठलाही संबंध नाही. दुष्काळाच्या काळात अडचण असणा-या लोकांना भेटून आपण त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच या दौ-याच्या पार्श्र्वभूमीवर सरकारी अधिकारी खडबडून जागे झाल्याने दुष्काळात पिचलेल्या लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्यातही दुष्काळाच्या प्रश्नात काही ठिकाणी राजकारण झाले असल्याचे विखे यांनी सांगितले.
शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेस पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार काय, असा सवाल केला असता, ते म्हणाले खासदार वाकचौरे यांना कुठल्या पक्षाकडून उभे राहायचे तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनीच सोडवला पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना विखे म्हणाले, देशातील प्रत्येक माणूस हा त्या-त्या पदासाठी लायक असतो. केवळ त्याला मिळालेल्या संधीवर काही गोष्टी अवलंबून असतात. देशातील निवडणुका आयत्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीनुसार होत असतात. आत्तापर्यंतच्या निवडणुका त्यानुसारच झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliaments 2 wards of congress
First published on: 21-08-2013 at 01:43 IST