बेस्टची एसी बससेवा तोटय़ात चालत असल्याने ती बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज तोटय़ात सुरू असलेल्या एसी बससेवेची मुळातच व्यवहार्यता न तपासता ती कशी काय सुरू करण्यात आली? त्याचप्रमाणे ज्या बसेस या योजनेंतर्गत विकत घेण्यात आल्या त्यांचा सक्षमता काळ (वॉरंटी पीरियड) किती होता? असे प्रश्न विचारले जात आहेत.
खरे तर या एसी बसेस सेवेत दाखल झाल्यापासूनच त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. एसी न चालणे, एसीच्या पाण्याची गळती, वाटेत बस बंद पडणे, चढावर बस न चढणे, वेगमर्यादा.. अशा एक ना दोन- असंख्य तक्रारी या सेवेबद्दल पहिल्यापासूनच आहेत. मग अशा ‘खटारा’ बसेस कुठल्या निकषांवर आणि कुणाच्या लाभासाठी विकत घेतल्या गेल्या? त्यासाठी जबाबदार असणारे तत्कालीन बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे आणि बेस्ट समितीचे तेव्हाचे अध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी यांनी या बसेस विकत घेण्यासंबंधी केलेल्या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
एसी बसेसच्या भोंगळ सेवेबद्दल बेस्ट प्रशासनाकडे प्रवाशांनी तोंडी, लेखी तसेच ई-मेलद्वारे अगणित वेळा तक्रारी करूनही त्याची दखल घ्यायचे राहिलेच बाजूला; त्याची साधी पोचही तक्रारदारांना मिळत नाही. एकेकाळी बेस्टच्या सेवेसंबंधातील तक्रारींबद्दल खुलासे करण्यात तत्पर असणारे बेस्टचे जनसंपर्क खातेही आता या तक्रारींसंबंधी डोळ्यांवर कातडे ओढून घेत आहेत. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची व्होल्वो एसी बससेवा अत्यंत उत्तमरीत्या सुरू असताना बेस्ट उपक्रमाच्याच या ‘खटारा’ एसी बसेस कायम गॅरेजमध्ये पडून का असतात, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. एसी बसेस तोटय़ात चालवाव्या लागतात, असा दावा बेस्टकडून करण्यात येत असला तरीही दिंडोशीहून एल अ‍ॅण्ड टी- महापे या मार्गावरील एसी ५२५ बसेस सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांनी खच्चून भरून जात असतात. या मार्गावरील नियोजित बसेसपैकी जवळजवळ निम्म्या बसेस नादुरुस्त असल्याने डेपोमध्ये धूळ खात पडून असतात. आणि ज्या तुटपुंज्या बसेस सुरू असतात त्यांचीही अवस्था भयानक असते. यासंबंधात प्रवाशांनी तक्रारी करूनही दिंडोशीचे डेपो मॅनेजर ढिम्म हलत नाहीत. २१०० रुपयांचा मासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपण काय लायकीची सेवा देतो, हे एकदा बेस्ट समिती अध्यक्षांसह समिती सदस्यांनीही या बसने प्रवास करून वानगीदाखल जाणून घ्यावी, असे संतप्त प्रवाशांचे म्हणणे आहे.