अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष व कवी फ. मुं. िशदे यांची ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’ ही कविता तशी प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे. मात्र, या कवितेचे पोस्टर करून ही कविता िभतीवर कायम सर्वासमक्ष असावी, असा विचार अरुण चव्हाळ यांनी व्यक्त केला आणि तो कृतीतही आणला. ‘आई’ कवितेचे पोस्टर वितरित करण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात पार पडला.
अरुण चव्हाळ यांनी कल्पकतेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या ‘रानमेवा’ या मळ्यात त्यांनी हा कार्यक्रम घेतला. अध्यक्षस्थानी कवी इंद्रजित भालेराव, तर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. संध्या दुधगावकर, प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख, कृषी भूषण सोपान आवचार, मसाप कोषाध्यक्ष देविदास कुलकर्णी, रमेश गोळेगावकर आदींची उपस्थिती होती.
मराठीत अनेक कवींनी आईची महती वर्णन केली. या सर्व कवींच्या आई विषयावरील कविता श्रेष्ठच आहेत; पण आईसंबंधीच्या जात्यावरील ओव्या सर्वश्रेष्ठ आहेत, असे प्रतिपादन या वेळी भालेराव यांनी केले. वरपुडकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. श्रीमती दुधगावकर यांनी आईची संवेदनशीलता प्रत्येकालाच माहीत असते, आईचे महत्त्वही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पण तरीही आईविषयी सर्वानीच कृतज्ञ राहिले पाहिजे, असे सांगितले.
कांतराव देशमुख, अॅड. गोळेगावकर, अवचार आदींची भाषणे झाली. पोलीस अधीक्षक पाटील यांनीही आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या. मुगळीकर यांनी ‘फकीर’ कविता सादर केली. उपस्थितांना ‘आई’ कवितेचे पोस्टर भेट देण्यात आले. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक अरुण चव्हाळ यांनी आभार मानले.