ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आज ऐरोली ते वाशी परिसरात रूटमार्च काढण्यात आला. निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात आणि मोठय़ा संख्येने मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे हा संदेश देण्यासाठी या रूटमार्च काढण्यात आल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. रबाले एमआयडीसी येथील मुकुंद पोलीस चौकी येथून या रूटमार्चला सुरुवात झाली. पोलीस उपायुक्त मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, २५ साहाय्यक, उपपोलीस निरीक्षक यांच्यासह ३५० पोलीस कर्मचारी, केंद्रीय औद्योगिक बल, राज्य राखीव बल जवान आणि बुलेटप्रूफ वाहने, वज्र, मास आदी वाहनांचा समावेश यात होता. पोलीस प्रशासन जनतेसोबत आहे. प्रत्येकाने निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त मेंगडे यांनी या वेळी केले. त्याचप्रमाणे मतदानाच्या वेळेस गोंधळ घालणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.