घर ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत गरज असून घरासाठी आयुष्यभराची मेहनत करावी लागते. त्यानंतरच घराचे स्वप्न साकार होत असते. घरासाठी करावी लागणारी ही कसरत सगळ्यांनाच परिचयाची असली तरी अंबरनाथच्या प्रवीण पाठारे यांना ‘लोकसत्ता वास्तुरंग’च्या वास्तुलाभ उपक्रमातून खरेदी केलेल्या घरावर चक्क दुसरे घर पारितोषिक म्हणून मिळाले. ‘लोकसत्ता वास्तुरंग’ वास्तुलाभ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचा सांगता सोहळा शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील टीपटॉप प्लाझाच्या सभागृहामध्ये पार पडला. घरावर घर मोफत हा चमत्कार असून या काळातही असा चमत्कार घडू शकतो हे ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून सत्यात उतरले आहे. ‘लोकसत्ता’ने खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण केल्याची भावना या वेळी प्रवीण पाठारे यांनी व्यक्त केली. त्या वेळी ‘तुळसी इस्टेट’चे भावीन पटेल आणि किंजल पटेल यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक म्हणून घराच्या चाव्या प्रदान करण्यात आला. या उपक्रमातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ‘केसरी टूर्स’कडून मिळणारी सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया सहल ललित कुमार ढेकळे यांना मिळाली. केसरीच्या संगीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
२०१४ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये नवे घर खरेदी करणाऱ्या वाचकांसाठी ‘लोकसत्ता’ने तुलसी इस्टेट, केसरी टूर्स आणि जे. के. एन्टरप्रायझेस यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचे आयोजन केले होते. या काळात घर खरेदी करणाऱ्यांना ‘लोकसत्ता’च्या वतीने एक अर्ज उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यात वाचकांनी ‘लोकसत्ता’विषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यातून निवडण्यात आलेल्या भाग्यवान विजेत्यांना या उपक्रमातून पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरणाचा रंगतदार कार्यक्रम ठाण्यातील टीपटॉप प्लाझाच्या डायमंड सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी तुलसी इस्टेटचे भावीन पटेल, किंजल पटेल, केसरी टूर्सच्या संगीता पाटील, जे. के. एन्टरप्रायझेसचे राज नायर आणि ठाण्यातील विकासक उपस्थित होते. पारितोषिक विजेत्यांपैकी नीलेश साळवी यांना एचडी एलईडी टीव्ही, सीमा पाटील आणि महादेव बहुलेकर यांना डबलडोअर रेफ्रिजरेटर, तर प्रफुल्लदत्त भांगले आणि नंदा काकडे यांना वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.