नागपूर महापालिकेचे शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवाला येत्या १८ जूनपासून प्रारंभ होणार असून या महोत्सवाच्या निमित्ताने १६ नोव्हेंबरला यशवंत स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या प्रमुख कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली. या महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, स्पर्धात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
शतकोत्तरी महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असले तरी १६ नोव्हेंबरला प्रमुख कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपती या कार्यक्रमात सायंकाळी ५.३० ते ६. ३० पर्यंत उपस्थित राहतील. यानिमित्ताने शहरातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार केला जाईल. येत्या मंगळवारी, १८ जूनला महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्या दिवशी शहरातील सर्व थोर पुरूषांच्या पुतळ्याला महापौर आणि महापालिकेचे पदाधिकारी माल्यार्पण करून अभिवादन करणार आहे. महापालिकेच्या सर्व इमारतीवर त्या दिवशी रोषणाई करण्यात येईल. दुपारी ४ वाजता महालातील टाऊन हॉलमधील सभागृहात नागपूरच्या महापालिकेचा इतिहास आणि विविध विभागातील कार्यपद्धती याचे सादरीकरण आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शताब्दी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  या महोत्सवासाठी विशेष लोगो तयार करण्यात आला असून महापालिकेच्या सर्व वाहनांवर, कार्यालयात आणि इतर ठिकाणी लावण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात महापौर करंडक आणि इतरही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने ‘नागपूर थीम साँग’ तयार करण्यात येणार असून त्यासाठी गीत स्पर्धा ठेवण्यात आली. गीतांची निवड झाल्यावर गायक अवधूत गुप्ते किंवा डॉ. सलील कुळकर्णी यांच्यासह काही स्थानिक कलावंताना घेऊन कार्यक्रम सादर करण्यात येईल. नागपूर शहराच्या पुढील शंभर वर्षांचा विकास आराखडय़ासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील नदी नाले, तलावाचे लोकसहभागातून पुनरुजीवन, स्वच्छ व सुंदर नागपूरसाठी विविध स्पर्धाचे आयोजन, राष्ट्रीय पातळीवर चित्रकार व छायाचित्रकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा, अखिल भारतीय महापौर व स्थायी समिती अध्यक्षाच्या परिषद, राष्ट्रीय पातळीवरील विविध पक्षनेत्यांची परिषद, विविध क्रिडा महोत्सव, सायकल मॅरोथॉन, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, नागपूर शहरातील चित्रकारांच्या माध्यमातून वॉल पेटिंग, उद्योजकांची परिषद, युवा उद्योजक पुरस्कार, संगीत आणि नृत्य महोत्सव, नागपूर शहरातील नागरी आरोग्य , नागरी शिक्षण राहणीमान आणि आर्थिक प्रगतीचा गेल्या ५० वर्षांचा आलेख तयार करण्यासाठी सर्वेक्षण, आरोग्य शिबिर, फूड फेस्टीवल, विविध क्षेत्रातील नामवंताचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.