जिल्हा सहकारी बँक कर्जप्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या बडय़ा नेत्यांना अटक होत नसल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत कान उपटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधीक्षकांनी बठक घेऊन कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ७ नोव्हेंबपर्यंत कारवाई न झाल्यास बांगडयांचा आहेर देण्याचा इशारा भाजप महिला आघाडीने अधीक्षकांना भेटून दिला. जनआंदोलन समितीही रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे आता अटकसत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेच्या कर्जप्रकरणात काही संस्थांना विनातारण बनावट कर्ज दिल्याप्रकरणी गेल्या २ ऑक्टोबरला प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशावरून बँकेच्या तत्कालीन २४ संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार साहेबराव दरेकर, धर्यशील सोळंके, रमेश आडसकर यांच्यासह डझनभर दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. संत जगमित्र नागा सूतगिरणी कर्जप्रकरणात आमदार धनंजय मुंडे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील आदींचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षाच्या दिग्गजांवर गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अटक करण्यास दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळले. गुन्हे दाखल होऊन महिना झाला, तरी आरोपींना अटक होत नसल्याने ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात खासदार मुंडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका करीत पोलीस अधीक्षक मंडलिक यांचे जाहीरपणे कान उपटले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही केली. त्यामुळे गडबडून गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी अधीक्षक मंडलिक यांनी तातडीची बठक घेतली. बठकीत गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी भाजप महिला आघाडीच्या वतीने अधीक्षक मंडलिक यांची भेट घेऊन ७ नोव्हेंबपर्यंत आरोपींना अटक करा अन्यथा पोलीस प्रशासनाला बांगडय़ांचा आहेर दिला जाईल, असा इशारा देण्यात आला. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलन समितीने गुन्हे दाखल झालेल्या संचालकांना तत्काळ अटक करा, ठेवीदारांचे पसे तत्काळ परत करा, ठेवी देताना दुजाभाव करून नका, अनेकांचे विवाह, ऑपरेशन थांबले आहेत, या साठी पसे द्या या मागणीसाठी ११ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ठेवीदारांच्या बठकीला मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला असून आता गुन्हा दाखल झालेल्या दिग्गजांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत धाडसत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.