एलबीटीविरोधात किरकोळ व्यापारी व विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत ‘बंद’मुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. एलबीटी लागू केल्याने व्यापाऱ्यांचे नेमके काय नुकसान होणार आहे हे अद्याप बहुतांश ग्राहकांच्या लक्षात आलेले नाही. मात्र एलबीटी लागू झाल्यावर जकातचोरी करता येणार नाही यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्याला वेठीला धरले आहे, हे लक्षात आल्याने या बंदविषयी नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. त्यातच भर म्हणजे शिवसेनेने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन राज्यपालांकडे त्यांची रदबदली केल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे.
भाजीपाला, दूध, औषधे आदी वस्तू वगळता किराणा मालाचे व्यापारी, फळविक्रेते, खाद्यपदार्थाची दुकाने या बंदमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे, तांदूळ, कडधान्ये, डाळी, ब्रेड आदी वस्तूंच्या खरेदीकरिता आलेल्या ग्राहकांना बंद दुकानाचे तोंड बघून माघारी फिरावे लागते आहे.
बंदच्या भीतीमुळे अनेक मुंबईकरांनी शनिवारी-रविवारीच आवश्यक वस्तूंची बेगमी करून ठेवली होती. परंतु, हातावर पोट असलेले रोजंदारीवरील मजूर, कामगार यांचे मात्र या बंदमुळे फारच हाल होत आहेत. दररोज आवश्यक असेल तितकेच तांदूळ, डाळ, भाजी खरेदी करायची आणि दिवस भागवायचा, असा या बहुतेक कामगारांचा शिरस्ता असतो. पैशाअभावी आवश्यक वस्तूंची साठवणूक करणे अशा कामगारांना शक्य होत नाही. त्यांचे या बंदमुळे चांगलेच हाल झाले आहेत. दुकानेच बंद असल्याने डाळ-तांदूळ घ्यायचे कुठून असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे, वडापाव, सॅण्डवीच, भेळ असे रस्त्यावर मिळणारे पदार्थ खाऊन गेले काही दिवस आम्ही गुजराण करतो आहोत, असे ईश्वर यादव या बोरिवलीतील एका सोसायटीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने सांगितले. काही दुकानदार मागच्या दाराने आपल्या नेहमीच्या ग्राहकांना आवश्यक वस्तू पुरवित आहेत. ‘आमच्या किराणा दुकानदाराने त्याचा सेल नंबर देऊन ठेवला आहे. काही सामान लागल्यास कळवा, असे त्याने बंद सुरू होण्याआधीच सांगितले होते. त्यामुळे, आम्हाला काही सामान लागले तर आम्ही त्याला फोन करून घरी मागवून घेतो,’ अशी प्रतिक्रिया माहीम येथे राहणाऱ्या शीतल केतकर या गृहिणीने व्यक्त केली.
व्यापारी मागील दाराने आपला धंदा करीत आहेत. मग हा बंदचा देखावा कशाला, असा सवाल मेधा पोयरेकर या महिलेने व्यक्त केली. कारण, ब्रेड, अंडी यांच्यासारख्या लहानसहान वस्तूंकरिताही फोन करावा लागतो, हे कंटाळवाणे आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
दादर (पश्चिम) येथे राहणारे कृष्णकुमार ऊर्फ बाबा जोशी यांनी सांगितले की, आमच्या भागात बुधवारपासून किराणा सामानाची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हे आंदोलन असेच सुरू राहिले तर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवायला नक्कीच सुरुवात होईल. वडापाव, भजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या मंडळींचीही आता पंचाईत होणार आहे. या ‘बंद’चा फटका सर्वसामान्य नागरिकांना का, दुकाने बंद न करता ती सुरू ठेवून व्यापारी आपला निषेध का नाही नोंदवत, असा सवालही जोशी यांनी केला.
दुकाने बंद करून आंदोलन करणे म्हणजे हा सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांना त्रास देण्याचा प्रकार आहे, असे मत चिंचपोकळी (पश्चिम) येथे राहणारे भाऊ सावंत यांनी व्यक्त केले.
दरम्यान, १० मे पासून तर या संपात औषधाचे विक्रेतेही सहभागी होणार आहेत. औषध दुकानेही बंद राहणार, यामुळे मात्र सर्वसामान्य मुंबईकर धास्तावून गेले आहेत. औषध विक्रेतेही बेमुदत बंद ठेवतील या भीतीने आपल्या गरजेची औषधे आताच मागवून ठेवा, असा एसएमएस सर्वत्र फिरतो आहे.

शिवसेनेविषयी संताप
व्यापाऱ्यांच्या संपामुळे विनाकारण सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची तर ‘सहन होत नाही, सांगताही येत नाही’ अशी स्थिती झाली आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी खरे तर सर्वसामान्यांची बाजू घेणे अपेक्षित असते. परंतु एरवी जनसामान्यांचा कळवळा असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने व्यापाऱ्यांचीच तळी उचलून धरली आहे. गुरुवारी महापौर सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखील मुंबईतील शिवसेनेच्या निवडक नेत्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना जाऊन भेटले. एलबीटीची अंमलबजावणी थांबविण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी या नेत्यांनी केली.