मानव विकास कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षांत देण्यात आलेल्या अडीचशे कोटींपैकी १८२ कोटी रुपये निधी अखíचत राहिला. योजनांवरील अत्यल्प खर्चावर उतारा म्हणून आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, तसेच अंगणवाडी इमारत बांधकामाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील १२२ तालुक्यांमध्ये ज्या गावांमधील अंगणवाडय़ा झाडाखाली भरतात, अशा ठिकाणी प्रत्येकी साडेचार लाख रुपये खर्चून इमारत उभारण्यात येणार आहे. या बरोबरच आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या दोन बांधकामविषयक योजनांबरोबरच अभ्यासिका विकसनाचा कार्यक्रमही ठरविण्यात आला आहे.
मानव विकास मिशनचे आयुक्त म्हणून भास्कर मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर वेगवेगळ्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या. मानव विकास मिशनची व्याप्ती असणाऱ्या १२ जिल्ह्य़ांतील २५ तालुक्यांत प्रत्येकी ११ अंगणवाडय़ांसाठी इमारती बांधण्यात येणार आहेत. या साठी ६१ कोटी ८८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबरअखेर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. निविदा नीटपणे व्हाव्यात, म्हणून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची समितीही गठीत केली असून या इमारती नऊ महिन्यांत बांधल्या जाव्यात, असे ठरविण्यात आले. इमारत नसणाऱ्या आरोग्य उपकेंद्रासाठी २५ तालुक्यांत प्रत्येकी ३ याप्रमाणे ३७५ इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी ९३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे.
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय नाही, तेथे अभ्यासिका सुरू करण्यात आल्या. भारनियमनामुळे बऱ्याच गावांत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे जिकिरीचे झाले असल्याने ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्याचे परिणाम फारसे चांगले नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात. योजनेसाठी पुरेसा निधी नाही, अशी ओरड होत होती. त्यामुळे अभ्यासिकांसाठी ‘क’ वर्ग नगरपालिका व मोठय़ा गावांमध्ये अभ्यासिका स्थापन करण्यास तरतूद वाढविण्यात आली. प्रत्येक अभ्यासिकेसाठी १ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके, ती ठेवण्यासाठी कपाटे, सोलार वीज व इन्व्हर्टरची सोय करण्यास ही रक्कम दिली जाईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये एखाद्या खोलीत अभ्यासासाठीच्या सोयी निर्माण करून देण्यासाठी ३१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. २५ तालुक्यांत ३ हजार १२५ अभ्यासिका सुरू करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अजून अप्राप्त आहे. १२५ तालुक्यांसाठी अडीचशे कोटींचा निधी अजून मिळाला नाही. अखíचत रकमेसाठी ३ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.