सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर चलबिचल सुरू झाली असून मोठय़ा प्रमाणात राजकीय बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून इतर पक्षांमध्ये गेलेले काही कार्यकर्ते व नेते स्वगृही परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यस्तरावर शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना बाळासाहेबांनी ‘या चिमण्यांनो, परत फिरा..’ अशी साद घातली होती. त्यांच्या निधनानंतर नांदगाव तालुक्यात तरी अशा चिमण्या परत फिरण्यास सुरूवात झाली आहे.
नांदगाव तालुका हा काँग्रेस व शिवसेनेचा बालेकिल्ला. दोन्ही पक्षांना काही वर्षांपासून समसमान संधी मिळाली. परंतु शिवसेनेतील काही जण राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेत दोन-तीन वर्षांपासून अस्वस्थता निर्माण झाली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर बाहेर गेलेल्या नेत्यांची भावनिक

चलबिचल सुरू झाली आहे. मनमाड येथे मंगळवारी झालेल्या श्रद्धांजली सभेत या विषयाला सर्वप्रथम माजी आमदार व सध्या राष्ट्रवादीत असलेले राजाभाऊ देशमुख यांनी जाहीरपणे वाचा फोडली. यापुढे भगव्या झेंडय़ाचा पाईक होऊन बाळासाहेबांचा शिपाई म्हणून आयुष्यभर जगण्याचा आपला विचार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. साहेबांचे म्हणजे पर्यायाने शिवसेनेचे काम करायचे, असा त्यांचा रोख होता. शिवसेनाप्रमुख आज नाहीत पण त्यांच्या आठवणीने यापुढे आपली काम करण्याची इच्छा आहे. दोन-तीन वर्षे बाहेर राहावे लागल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावरून ते स्वगृही परतणार हे निश्चित झाले आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते माजी शहरप्रमुख रऊफ मिर्झा यांनीही यापुढे आपण शिवसेनेचे काम करणार असल्याचे सभेत स्पष्ट केले. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनीही हिंदूत्वाच्या लाटेत सहभागी होण्याचे सुतोवाच केले आहे. या तालुक्याने दोन वेळा शिवसेनेला आमदार दिले आहेत. तिसऱ्या वेळीही भरभरून ७५ हजारांवर मते दिली आहेत. त्यामुळे बाहेर गेलेली मंडळी परतल्यास शिवसेना तालुक्यात पुन्हा भक्कम होऊ शकेल, हेच या सभेने दाखवून दिले आहे.